पर्यटनमंत्र्यांवर कारवाई करा : काँग्रेस

मोपा विमानतळाचे काम बंद पाडल्याचे प्रकरण


20th March 2018, 06:03 am



प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माेपा विमानतळाचे उद्घाटन केले होते. तेच काम पर्यटनमंत्री बाबू अाजगावकर यांनी आपल्या समर्थकांसह बंद पाडले. त्यानंतर तेच काम पर्यटनमंत्री चोवीस तासांत श्रीफळ वाढवून सुरू करतात, ही कृती बेकायदेशीर आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी पेडणे काँग्रेस गटातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात अाली.
पेडणे काँग्रेस गटातर्फे घेण्यात अालेल्या या पत्रकार परिषदेला गटाध्यक्ष उमेश तळवणेकर, उत्तर गोवा काँग्रेस सरचिटणीस सुभाष केरकर, उत्तर गोवा सदस्य अॅड. मुरारी परब, उपाध्यक्ष दशरथ महाले, प्रशांत अारोलकर, सदस्य बोंद्रे, उत्तम कशाळकर, राजन पार्सेकर, उल्हास वसकर व पार्सेकर उपस्थित होते.
उमेश तळवणेकर म्हणाले, जीएमअार कंपनीबरोबर नोकऱ्यांसाठी करार करणार, असे सांगून तो केल्यानंतरच काम सुरू करणार, असे मंत्री अाजगावकर यांनी सांगून काम बंद पाडले होते. ते काम परत लगेच सुरू केल्याने मंत्री अाजगावकर यांनी जीएमअार कंपनीकडे कुठल्या नोकऱ्यांसाठी व कोणत्या व किती नोकऱ्या पेडणेवासीयांना मिळणार, तो करार पेडणेच्या जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी केली.
अॅड. मुरारी परब यांनी पेडणेकरांना अाजगावकर फसवत असल्याचा आरोप केला. सुभाष केरकर यांनीही विचार मांडले. मंत्री अाजगावकरांनी शेतकऱ्यांना कृषी कार्ड देण्याचे आश्वासन दिले होते. ती कार्डे कुठे आहेत? असा प्रश्न दशरथ महाले यांनी उपस्थित केला.