केरी सत्तरीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी पिण्यायोग्य !

वाळपईच्या पाणी पुरवठा खात्यामार्फत दावा


20th March 2018, 03:58 am
केरी सत्तरीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे पाणी पिण्यायोग्य !


प्रतिनिधी। गोवन वार्ता      

वाळपई : केरी सत्तरी येथे उभारलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातून पुरवठा होणाऱ्या पाण्यात कोणत्याही प्रकारचे धोकादायक जंतू नसल्याचा दावा वाळपईच्या पाणी  पुरवठा  खात्यामार्फत करण्यात आला आहे.       

 दरम्यान, आरोग्य खात्यातर्फे पिण्याच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी या पाण्याची गांभीर्याने तपासणी करावी, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. यासाठी वाळपई सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या मणिपाल  व्हायरस शोध पथकाकडे पाण्याच्या चाचणी करण्याची जबाबदारी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पातून होणारा पाणी पुरवठ्यात रोगाचे जंतू आहेत, त्यामुळे हे पाणी पिण्यालायक नाही, असा दावा अनेक वेळा भागातील नागरिकांनी वेळोवेळी खात्याकडे केला आहे. तसेच हा प्रश्न अनेकवेळा भागातील ग्रामसभेमध्ये उपस्थित केला आहे.  अनेकवेळा संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार करून सुद्धा  काहीच निष्पन्न न झाल्याने  नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.       

पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाणी पुरवठा खात्याच्या माध्यमातून सदर भागात पाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे. मात्र सदर प्रकल्पात आवश्यक स्वरूपाची जॅकवेल  यंत्रणा उपलब्ध नसल्याने पाण्याचे याेग्य प्रकारे शुद्धीकरण  हाेत नाही, असा आरोप नागरिकांतून केला जात आहे. यामुळे भागातील नागरिकांना नळांद्वारे गढूळ पाणी पुरवठा होत असून हे प्राणी प्रदूषित असल्याच्या तक्रारी सातत्याने नागरिकांतून करण्यात येत आहेत. मात्र याबाबत  पाणी पुरवठा खात्याने या पाण्याची तपासणी केली असून हे पाणी पिण्याबाबत कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे  स्पष्ट केले आहे.      

मणिपालच्या पथकाकडून चाचणी करण्याची मागणी  

पंधरा दिवसांपूर्वी काही नागरिकांनी स्वतःच्या नळाच्या पाण्याचे नमुने गोळा करून आरोग्य खात्यामार्फत तपासणी करण्यात आली होती. यामध्ये कॅलिफॉर्म  बॅक्टेरिया आढळल्याचा दावा केला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर नागरिकांनी पाणी पुरवठा खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करून गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली होती. दरम्यान, शेळपे  येथे  शिगेला, चरावणे येथे रोटा  व्हायरस याचा शोध घेण्यासाठी मणिपालच्या पथकाने  महत्त्वाची भूमिका वठविली आहे. त्यामुळे या  भागातील  पाण्याची तपासणी त्याच पथकाकडून करून घेण्याची मागणी केली आहे.