धावे -सत्तरीत पाण्याची समस्या तीव्र

ग्रामस्थांची आक्रमक भूमिका : वाळपईत पाणी पुरवठा कार्यालयावर धडक


20th March 2018, 03:53 am
धावे -सत्तरीत पाण्याची समस्या तीव्र

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

वाळपई : धावे-सत्तरी येथील विहिरी आटत चालल्यात आहेत,  तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबाबत कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. यामुळे धावे गावातील पोळेकरवाडा   नागरिकांनी  वाळपई येथील पाणी पुरवठा खात्याच्या  कार्यालयावर धडक देऊन आपला संताप व्यक्त केला.      

 पिण्याच्या पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा  इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला. याची दखल घेत तात्पुरती व्यवस्था म्हणून त्वरित टँकरची व्यवस्था करण्याचे आश्वासन देऊन सोमवारी संध्याकाळी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र ही तात्पुरती व्यवस्था असून कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या दीड महिन्यापासून सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्‍न तापला आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही गावांमध्ये मानवी आरोग्याला धोकादायक ठरणाऱ्या राेगजंतूंची पैदास होण्याचा प्रकार उघडकीस आला.  सध्या सत्तरी तालुका पाणी समस्येबाबत  बराच चर्चेत आला आहे. 

महिलांना करावी लागते पाण्याची प्रतीक्षा 

पाण्याची समस्या तीव्रतेने जाणवू लागल्याने महिलांना आपली रोजची कामे बाजूला ठेवून पाण्याच्या प्रतीक्षेत राहावे लागते. याबाबत अनेक वेळा पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाही. त्यामुळे शेवटी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी वाळपई येथील पाणी पुरवठा खात्याच्या कार्यालयावर मोर्चा आणावा लागला, अशी प्रतिक्रिया मोर्चातील महिलांनी व्यक्त केली.

अभियंत्याला धरले धारेवर

साेमवारी सकाळी या प्रभागाचे  पंच सभासद रामा वरक  यांच्या नेतृत्वाखाली महिला व पुरुष ग्रामस्थांनी पाणी पुरवठा खात्याच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी नागरिकांनी  सहाय्यक अभियंता एकनाथ पास्ते  यांना विविध प्रश्नांचा भडिमार करून  चांगले धारेवर धरले.  यावेळी रामा खरवत यांनी  सदर भागाची पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर असून कोणत्याही परिस्थितीत तात्पुरती उपाययोजना करण्याची मागणी केली व याच गावाच्या नजीक असलेल्या एका विहिरीत पाण्याचा नैसर्गिक स्रोत उपलब्ध आहे. या ठिकाणी योग्य उपाययोजना करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी वरक यांनी केली. सध्या या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पालापाचोळा साठला असून हे पाणी  प्रदूषित झाले  आहे. याचा वापर पिण्यासाठी करणे अत्यंत धोकादायक आहे. यासाठी प्रथम  या विहिरीची  साफसफाई करावी,  अशी मागणी केली.