आंदोलकांचा रुद्रावतार

सरकारच्या अपयशामुळे खाण अवलंबितांचे आंदोलन हिंसक


20th March 2018, 03:26 am
आंदोलकांचा रुद्रावतार

आंदोलक, पोलिसांसह 

९ जण जखमी, ११ अटकेत

प्रवासी, विद्यार्थी, पर्यटकांना वाहतूक कोंडीचा फटका

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : सर्वोच्च न्यायालयाच्या खाणबंदी आदेशानंतर राज्यातील खाण उद्योग कधी आणि कसा सुरू होईल, याबाबत ठोस उत्तर देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले. त्यामुळे सोमवारी सकाळी राजधानी पणजीत धडकलेल्या खाण अवलंबितांच्या आंदोलनाने दुपारनंतर रुद्रावतार धारण केला. थेट पोलिसांवर दगड आणि बाटल्यांचा वर्षाव सुरू केलेल्या हिंसक आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला केला. यात चार आंदोलक व पाच पोलिस जखमी झाले आहेत. शिवाय पोलिसांनी ११ आंदोलकांना अटक केली आहे. 

आंदोलनामुळे पणजी बसस्थानकाजवळ क्रांती सर्कलच्या परिसरासह दोन्ही मांडवी पूल काही तास बंद स्थितीत होते. त्यामुळे राज्यातील अंतर्गत आणि बाहेरील विविध भागांतून राजधानी पणजीत येणारी वाहतूक खोळंबली.  त्यामुळे स्थानिक, प्रवाशी आणि बारावीच्या परीक्षेसाठी पणजीत आलेल्या विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसला. दरम्यान, खाणबंदीमुळे ओढविलेल्या आर्थिक संकटावर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी करीत राज्यभरातील सुमारे दोन ते तीन हजार खाण अवलंबितांनी सोमवारी पणजीत धडक दिली. पणजी परिसरात सकाळी १०.३० पर्यंत जमावबंदीचा आदेश लागू असल्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना मेरशी जंक्शनवर थांबवून ठेवले. पण जमावबंदीची वेळ उलटताच आंदोलकांनी पणजी कदंब बसस्थानकाच्या दिशेने कूच केली. ‘राज्यातील खाण उद्योग ताबडतोब सुरू करा’ अशा घोषणा देत त्यांनी आझाद मैदानावर जाण्याचा हट्ट धरला. परंतु कायदा व सुव्यवस्थेमुळे  जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी त्यांना तशी परवानगी दिली नाही. त्यामुळे आंदोलन पेटले. 

सुदिन, विजय, लोबोंची मध्यस्थी निष्फळ

मंत्रिमंडळ सल्लागार समितीचे सदस्य तथा सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर, दुसरे सदस्य तथा नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई व उपसभापती मायकल लोबो यांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तो व्यर्थ ठरला. सरकारने खाणप्रश्नी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, केंद्रीयमंत्री नितीन गडकरीही गोव्यात येऊन खाण अवलंबितांची कैफियत ऐकून घेतील आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील, अशी आश्वासने सुदिन ढवळीकर यांनी दिली. तरीही आंदोलकांचे समाधान झाले नाही. सरकारातील सर्व सदस्यांना आंदोलनस्थळी बोलाविण्याची मागणी त्यांनी लावून धरली. आंदोलक आपले ऐकण्याच्या स्थितीत नसल्याचे जाणवताच ढवळीकर तेथून माघारी वळले.

रक्ताळलेल्या स्थितीतही आंदोलन सुरूच

पोलिसांनी लाठीहल्ला केल्यामुळे अनेकांच्या अंगावर लाठीचे वळ उठले होते, अनेकांची डोकी फुटून रक्त वाहत होते, संशयित म्हणून अनेकांना पोलिसांकडून गाडीत कोंबण्याचा प्रयत्न सुरू होता, अशा परिस्थितीतही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. रक्ताळलेल्या स्थितीतही ते आपल्या मागण्यांवर ठाम होते. ‘रोजगार नसल्याने आता आम्ही उपासमारीने मरणार आहोत. थोडे, थोडे मरण्याऐवजी आम्हाला एकदाच मारून टाका’, असे म्हणत ते सरकारविरोधी घोषणाही देत होते.

दगड, बाटल्यांचा वर्षाव...वाहनांचे नुकसान अन् लाठीहल्ला !

 सरकारी प्रतिनिधींची मध्यस्थी निष्फळ ठरल्यानंतर दुपारी आंदोलनकर्त्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. आंदोलनकर्त्यांनी प्रारंभी क्रांती सर्कलजवळ सरकारी वाहने अडवून त्यांचे नुकसान केले. एक सरकारी वाहन पंक्चर करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यामुळे पोलिसांनी लाठीहल्ला सुरू केला. लाठीहल्ल्यामुळे आंदोलक वाट मिळेल, तिकडे पळू लागले. 

 रस्त्यावर रहदारी सुरूच असल्याने त्याचा सर्वसामान्य लोकांना तसेच वाहनचालकांनाही बराच त्रास झाला. आंदोलनकर्ते कदंब बसस्थानकावरून पळू लागले, तर पोलिस त्यांच्या मागावर धावू लागले. त्यामुळे कदंबा बसस्थानकावरील लोकांत भीतीचे वातावरण पसरले.

 दुसरीकडे आंबेडकर उद्यानात घुसून आंदोलनकर्त्यांनी पोलिसांची टर उडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आत जाऊन चोपले. त्याचवेळी आंदोलकांनी एक पोलिस वाहन व अग्निशामक दलाच्या बंबाच्या काचा फोडल्या. त्यामुळे पोलिसांनी लाठीहल्ला तीव्र केल्याने आंदोलकांनी काढता पाय घेतला.

पुनर्विचार याचिकेचा मसुदा सल्ल्यासाठी दिल्लीला

  पुनर्विचार याचिकेचा मसुदा तयार करून तो अॅटर्नी जनरलांच्या सल्ल्यासाठी पाठविण्यात आला आहे. त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर याच आठवड्यात याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल होऊ शकते.

  सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याचिकेचा मसुदा तयार करून तो सल्ल्यासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनाही दाखविण्यात येईल. कायदेशीर सल्लामसलत झाल्यानंतरच याचिका दाखल केली जाईल.

  खाणबंदी काही महिन्यांनंतर लागू करण्याची मागणी पुनर्विचार याचिकेतून करण्यात येणार आहे. काढून ठेवलेले खनिज किंवा हा मोसम संपेपर्यंत खाणी सुरू ठेवल्यास कर्मचारी वर्गाला दिलासा मिळेल, असे म्हणणे सरकार याचिकेत मांडण्याची शक्यता आहे.

विमान उड्डाणांवर परिणाम

आंदोलनामुळे अनेक विमानांची उड्डाणे विलंबाने झाली, तर दाबोळी विमानतळावर वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे अनेकांची विमाने चुकली. त्यात विदेशी पर्यटकांचाही समावेश होता. काहीजणांना इतर विमानांनी इच्छितस्थळी पाठविण्यात आले, तर काहींना तिकिटांची रक्कम परत करण्यात आली. काही जणांनी मंगळवारी प्रवास करण्याचे ठरविले आहे. 

घटनाक्रम

 सकाळी १०.३० : आंदोलकांकडून पणजी बसस्थानक परिसरात चक्का जाम, दोन्ही पुलांवरील वाहतूक रोखल्याने महामार्गांवर ट्राफिक जॅम, जिल्हाधिकारी नीला मोहनन, पोलिस अधीक्षक, मामलेदार, उपजिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल.

 ११.०० : आझाद मैदानाकडे जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी जमावबंदीमुळे क्रांती सर्कलजवळ रोखले.

 ११.१५ : आंदोलकांकडून रस्त्यावर ठाण, अखिल गोवा टॅक्सी मालक व चालक संघटनाही सहभागी.

 १२.३० : गोवा फाऊंडेशनचे संचालक क्लॉड अल्वारिस यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

 १.०० : मंत्रिमंडळ सल्लागार समितीचे सदस्य सुदिन ढवळीकर आंदोलकांच्या भेटीला.      

 १.४० : दुसरे सदस्य विजय सरदेसाई, ग्रामीण विकास मंत्री जयेश साळगावकर यांच्याकडून आंदोलकांची भेट. 

 २.०० : आमदार नीलेश काब्राल आंदोलनात, कामगार नेते पुती गावकर व ट्रक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आंदोलनांना मार्गदर्शन.

 २.३० : पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज सुरू.

 ३.३० : आंदोलकांची धरपकड 

 ४.३० : संतप्त आंदोलक माघारी.