मिकी पाशेको यांना अटकपूर्व जामीन मंजूर

न्यायालयाकडून साक्षीदारांवर दबाव न आणण्यासह अन्य अटी


18th March 2018, 02:35 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

मडगाव : उतोर्डाच्या समुद्र किनाऱ्यावर विनापरवानगी वाहन नेऊन तेथील जलक्रीडा व्यावसायिकांच्या पॅराशुटचे नुकसान केल्याप्रकरणी नुवेचे माजी आमदार मिकी पाशेको यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलिसांनी जप्त केलेले त्यांचे वाहन न्यायालयाने मुक्त केले आहे.                  

या प्रकरणात अर्जदाराला पोलिसांकडून अटक झाल्यास वैयक्तिक २० हजार रुपये हमी व तत्सम एका हमीदाराच्या बोलीवर त्याची सुटका करण्यात यावी. न्यायालयाच्या परवानगीशिवाय गोव्याच्या बाहेर जाऊ नये, पुढील ५ दिवस सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पोलिस ठाण्यावर चौकशीसाठी उपस्थित राहावे, या प्रकरणाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये, त्याशिवाय पुढील ६० दिवस उतोर्डा परिसरात भटकू नये, १५ दिवस बेताळभाटी परिसरात जाऊ नये, अशा अटी न्यायालयाने अर्जदाराला अटकपूर्व जामीन मंजूर करताना घातल्या आहेत.                  

गेल्या रविवारी मिकी पाशेको यांनी आपले वाहन उतोर्डाच्या समुद्र किनाऱ्यावर नेले होते. नंतर तेथील जलक्रीडा आयोजित करणाऱ्या फेनी फर्नांडिस यांच्या कुटुंबीयांशी त्यांचा वाद झाला होता. पाशेको यांनी वाहन पॅराशुटवरून नेऊन धंद्याचे नुकसान केल्याचा दावा फर्नांडिस कुटुंबियांनी केला होता. पाशेको व त्यांच्या साथीदारांनी त्यांना धमकी दिल्याने कोलवा व वेर्णा पोलिसांत तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या.                   

दरम्यान, तक्रारदार फर्नांडिस यांच्या मुलाने पाशेको हे उतोर्डातील एका शॅकमध्ये बसून मद्य प्राशन करीत असल्याचे चित्रिकरण सोशल मीडियावर प्रसारित केले होते. या प्रकाराला पाशेको यांनी आक्षेप घेतला होता. नंतर पोलिसांनी पाशेको यांना पोलिस ठाण्यावर बोलावून चौकशीला गती दिली होती.