सत्तेसाठीच भाजपकडून हिंदुत्वाचा वापर

शिवसेनेचे माजी गोवा प्रमुख रमेश नाईक यांचा आरोप


18th March 2018, 02:34 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

म्हापसा : समविचारी हिंदू संघटनांच्या हितरक्षणाकडे भाजप दुर्लक्ष करीत आहे. भाजप फक्त सत्ता मिळविण्यासाठीच व राजकीय फायद्यासाठी हिंदुत्वाचा वापर करीत अाहे, असा आरोप गोवा शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख रमेश नाईक यांनी केला आहे.                        

राज्यातील इतर ठिकाणांवरीलही छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटविण्याचा सरकारचा डाव असल्याचा संशय हिंदू जनजागृती समितीच्या जयेश थळी यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात उभी असलेल्या बेकायदा बांधकामांना हात लावण्याची सरकारची राजकीय इच्छा नाही, फक्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हात लावण्याची मर्दुमकी सरकार दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप हा हिंदूचा पक्ष असल्याचा सार्वत्रिक समज आहे. प्रत्यक्षात भाजप फक्त सत्ता मिळविण्यासाठीच हिंदुत्वाचा वापर करीत आहे. एकदा ती मिळाल्यावर हिंदूंना दिलेल्या वचनांचा त्याना विसर पडतो, असेही रमेश नाईक यावेळी म्हणाले.

वाळपई व तिस्क-उसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे काढून टाकण्यामागील सरकारच्या भूमिकेबद्दल त्यांनी सवाल उपस्थित  केला. भाजप व काँग्रेस पक्षामध्ये कोणताच फरक नाही, असे नाईक यांनी सांगितले.

शिवप‍्रेमींना विश्वासात का घेतले नाही ?

वाळपई येथील तसेच तिस्क-उसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हटविण्यापूर्वी राज्य सरकारने शिवप्रेमींना विश्वासात घ्यायला हवे होते. अर्ध पुतळा दुसरीकडे नेण्याच्या प्रश्न नाही, पण सरकारने हे काम मध्यरात्री का केल ? दिवसा उजेडा ते करणे शक्य नव्हते काय? असा प्रश्न नाईक यांनी केला.   शिवप्रेमींना त्यांनी याची कल्पना दिली असती तर आम्ही जरूर सरकारला मदत केली असती, असे रमेश नाईक यांनी यावेळी सांगितले.