मुक्तीधाम-फोंडा येथे दफनभूमीचे लोकार्पण

14th March 2018, 03:54 Hrs

प्रतिनिधी | गोवन वार्ता

फोंडा : फोंडा येथील  मुक्तीधाम हिंदू स्मशानभूमीत अज्ञात मृतदेहांसाठी एक सार्वजनिक दफनभूमीची जागा फोंडा पालिकेने मंगळवारी लोकार्पण केली आहे. ज्या अनोळखी लोकांचा धर्म कळू शकणार नाही किंवा ज्यांचा अंतिम संस्कार करायला कोणी नसणार त्यांच्यावर या दफनभूमीत अंतिम संस्कार केले जाणार आहेत.      

पालिकेचे उपनगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, नगरसेविका लालन नाईक, नगरसेवक सुनील देसाई, मुख्य अधिकारी नवनाथ नाईक आणि पालिकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.      

पालिकेने सोमवारी झालेल्या बैठकीत या संदर्भातील घोषणा केली होती आणि १२ मार्च रोजी ती समर्पित केली जाणार असे म्हटले होते. मुरगाव पालिकेनंतर अशी दफनभूमी फोंडा पालिकेने तयार केली आहे.      

यावेळी शांताराम कोलवेकर म्हणाले की, अज्ञात मृत व्यक्तींवर अंतिम संस्कार करण्यासाठी याची मदत होणार आहे. कुठल्याही व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्यावर अंतिम संस्कार करावे लागतातच. म्हणूनच ज्या मृतदेहांची ओळख पटणार नाही अशा व्यक्तींवर अंतिम संस्कार करायला या जागेचा उपयोग होणार आहे, असे ते म्हणाले.       

मुख्याधिकारी नवनाथ नाईक म्हणाले की, पालिका मंडळाने या दफनभूमीचे  काम पार पाडण्यास मदत केली असल्याने ते फार सहजपणे करता आले. सरकारी इस्पितळांत ज्या अनोळखी व्यक्तींचे मृतदेह ठेवले जातात, त्यांच्यावर अंतिम संस्कार करायला या सेवेची मदत होणार आहे.