गोव्याचे सरकार फक्त खास लोकांसाठीच

आपचे नेते एल्विस गोम्स यांचा पत्रकार परिषदेत आरोप


14th March 2018, 02:52 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : गोव्याचे युती सरकार हे गरीब जनतेकडे दुर्लक्ष करणारे व खास लोकांसाठीच चालणारे आहे. गेल्या वर्षभरात राजकारण सोडल्यास लोकांच्या हिताचे कोणतेच काम सरकारने केले नाही, असा आरोप आपचे नेते एल्विस गोम्स यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.            

सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून या एक वर्षांत सरकारने लोकहिताकडे कसे दुर्लक्ष केले आहे, यावर फोकस टाकण्यासाठी आपने मंगळवारी पणजीत पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत प्रदीप पाडगावकर, प्रदीप घाडी आमोणकर, सुनील सिंगणापूरकर, उमा वळवईकर उपस्थित होत्या.             

अनेक पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारमधील पक्षांनी आपल्या पक्षाची ओळख नष्ट केली आहे. हे सरकार गरीबांसाठी स्थापन झालेले नसून खास लोकांच्या भल्यासाठी वावरत आहे. कोळसा हाताळणीत वाढ, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, मोपा विमानतळ हे सरकारने खास लोकांच्या सोयीसाठी गोमंतकीयांवर लादले आहे. ग्रेटर पणजी पीडीएला विरोध होत असतानाही त्याकडे फक्त खास लोकांना अभय देण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे. खाण बंदीमुळे गोव्यावर परिणाम होणार असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने कोणतीच पावले उचलली नाहीत. कचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा झाले असून  टॅक्सी चालकांच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली जात आहे, असा आरोप गोम्स यांनी केला. गरीबांना प्राधान्य देण्याची आश्वासने देणाऱ्या सरकारचा राज्यकारभार सध्या कोलमडला आहे, असेही ते म्हणाले.            

प्रदीप पाडगावकर म्हणाले, कॅसिनो, प्रादेशिक आराखडा हे विषय बाजूला ठेवून युती सरकार राजकारण करीत आहे. प्लास्टिक मुक्त गोव्याची पोकळ अाश्वासने सरकार देत असून अद्याप प्लास्टिक मुक्तीला यश आलेले नाही. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळामध्ये घोटाळा झाला असून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक गावात स्मशानभूमी बांधण्याचा सरकारचा विचार फोल ठरला आहे.            

प्रदीप घाडी आमोणकर म्हणाले, सबका साथ, सबका विकास करण्याची भाषा करणाऱ्या सरकारच्या काळात खाण बंदीमुळे गोमंतकीयांचे जीव जाण्याची वेळ आली आहे. खाण बंदीला पूर्णपणे मनोहर पर्रीकर जबाबदार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यात भ्रष्टाचार वाढला असून त्याचा १५ दिवसांत पर्दाफाश करणार अाहे.