सत्तरीतील अनेक गावांत पाणी टंचाई

उपाययोजना आवश्यक : पुढील दोन महिन्यांत पाणी प्रश्न तापणार


14th March 2018, 02:39 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

वाळपई : पुढील दोन महिन्यांत तीव्र पाणीटंचाई जाणवणार असून सत्तरी तालुक्याच्या विविध भागांत पाणी प्रश्न तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असला तरी काही गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत 

आहे. 

पाणी प्रश्नावर सरकारने  आताच उपाययोजना न केल्यास  येणाऱ्या काळात नागरिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. गेल्या काही वर्षांपासून सत्तरी तालुक्याच्या विविध भागात सातत्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत असते. मात्र, सदर समस्या एप्रिल-मे या महिन्यात  प्रामुख्याने जाणवते. यंदा मात्र ही समस्या एक महिन्यापूर्वीच विविध गावांत जाणवू लागल्याने नागरिक त्रस्त बनले आहेत. म्हाऊस, दाबे, झरमे, चरावणे, हिवरे, कोपार्डे, पाल  या गावांमध्ये  तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून  नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या गावांत गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांचे नळ कोरडे पडले असून याबाबतच्या तक्रारी करूनही काहीही फायदा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गावांमध्ये नळाच्या पाण्याव्यतिरिक्त   पिण्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची सोय नसल्याने नागरिकांना नळाच्या पाण्यावर  विसंबून राहावे लागत असते. नळांना पाणी येणे बंद झाल्याने नागरिकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही  गावातील नागरिकांना  इतर गावांत जाऊन पाण्याची सोय करावी लागत आहे.  खासकरून महिलांसमोर मोठी समस्या निर्माण झाली असून आपला कामधंदा सोडून पाण्याच्या मागे धावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. पंधरा दिवसांपूर्वी गावातील महिलांनी वाळपई पाणी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र, याचा मोठा  फायदा झालेला नाही, असे महिलांचे मत आहे. वरील गावांना दाबोस पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा होत असतो तर गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याचा प्रवाह अचानकपणे बंद झाल्याने नागरिकांसमोर समस्या निर्माण झाली आहे. काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत अनेक वेळा पाणी खात्याशी संपर्क साधला असता दाबोस पाणी प्रकल्पात  बिघाड झालेला नसून नेहमीपणे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, नळांना पाणी का येत नाही या प्रश्नाला ते  निरुत्तर होतात, अशा तक्रारी नागरिक करीत आहेत. 

सत्तरी तालुक्यातील अनेक गावे वाळपई शहरापासून बऱ्याच अंतरावर असल्याने सदर ठिकाणी पाण्याचा अपेक्षित दाब पोचू शकत नाही. यामुळे नळांना पाणी येण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही यासाठी सरकारने वेगळ्या प्रकारची उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. 

तालुक्यातील काही पंचायत  क्षेत्रांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्वतंत्र असे प्रकल्प उभे केले असून सदर गावांमध्ये समस्या काही प्रमाणात आढळते. असे प्रकल्प निर्माण केल्यास समस्या कायमस्वरूपी मिटणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गोवा सरकारच्या पाणी पुरवठा खात्याने  अनेक वेळा गोमंतकीय जनतेला  पूर्णवेळ पाणीपुरवठा करण्याची  घोषणा केली आहे. मात्र, अंमलबजावणी कधी होणार? असा प्रश्न सध्या नागरिक विचारत आहेत.