उष्णतेमुळे आरोग्यवर्धक शहाळ्यांचे दर वाढले

14th March 2018, 02:56 Hrs

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : उष्णता वाढल्याने आरोग्यवर्धक  शहाळ्यातील पाण्याला नागरिक व पर्यटक महत्त्व देत आहेत. त्यामुळे शहाळ्यांची आवक वाढली असून त्यांचे दरही वाढले आहेत. ऐरवी ३० रुपये दराने मिळणारे शहाळे आता ४० ते ५० रुपयांना मिळत आहे.       

उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने राज्यात उष्णतेची लाट आली असून त्यापासून ओलावा मिळविण्यासाठी  राज्यात येणारे देशी, विदेशी पर्यटक व स्थानिक थंड पेयांच्या ठिकाणी धाव घेत आहेत. जागो जागी थंड पेयांचे स्टॉल लागलेले असून किनारी भागातील स्टॉलमध्ये थंड पेयांच्या दरातही वाढ झाली आहे. किनारी भागात पर्यटकांना शहाळे ५० रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे पर्यटकांच्या खिशाला कात्री लागत आहे. नारळाचा तुटवडा असल्याने त्यांच्या दरात प्रचंड वाढ झाल्यानंतर आता शहाळेही त्यांच्या पंक्तीत बसले आहे. उष्णतेमुळे कलिंगडे, लिंबू, उसाचा रस यांना मागणी वाढल्याने त्यांचे दरही वाढले आहेत.