योग प्रशिक्षकांना एकत्रित आणणार : मडकईकर

अकादमीचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते रविवारी पणजीत उद्घाटन

14th March 2018, 03:10 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता                               

पणजी :  राज्यातील वेगवेगळ्या माध्यमातून योग प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना एकत्रित आणण्यासाठी गोवा राज्य योग अकादमीची स्थापना करण्यात आली अाहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या अकादमीचे उद्घाटन रविवारी (दि. १८) सकाळी ११ वाजता कला अकादमी येथे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष तथा समाजकल्याण मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.                                

यावेळी योग प्रशिक्षक डॉ. सूरज काणेकर, रामचंद्र भरणे, मिलिंद महाले, प्रदीप नागवेकर आणि नीलम मराठे हे अकादमीचे सदस्य उपस्थित होते. मडकईकर पुढे म्हणाले, अकादमीतर्फे योग शिक्षणाबरोबरच मानवता, शिस्त, स्वच्छता आणि नैतिक आचरण यांचेही संस्कार केले जाणार आहेत. अकादमीचे आजमितीस ४० सदस्य असून राज्यभरात कार्य पसरविण्याचा संकल्प आहे. अकादमीचे कार्य कला अकादमीतच सुरू करण्यासंदर्भात कला आणि संस्कृती मंत्र्यांशी बोलणी करण्यात आली आहेत. त्यांच्या परवानगीनंतर अकादमीच्या मोकळ्या जागेत योग प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण वर्ग पूर्ण करणाऱ्यास अकादमीच्यावतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहे.                         

मंदिर, खुल्या जागेत प्रशिक्षण  

सध्या पतंजलीचे १५० ते २०० प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. प्रशिक्षण देताना मुले आणि वडीलधारी यांच्यासाठी स्वतंत्र वर्ग घेतले जातात. यासाठी मंदिर आणि खुल्या जागेचा उपयोग केला जातो. आम्ही पंचायत क्षेत्रात जागा निश्चित करून योगाचे धडे देण्याचे ठरवले आहे, असे डॉ. काणेकर यांनी सांगितले.                         

रविवारी उद्घाटन                        

योग अकादमीचे उद्घाटन रविवारी सकाळी ११ वाजता ब्लॅक बॉक्समध्ये होणार आहे. यावेळी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, ग्रामीण विकासमंत्री जयेश साळगावकर आणि अकादमीचे अध्यक्ष तथा वीजमंत्री पांडुरंग मडकईकर उपस्थित राहणार आहेत.

मंत्र्यांनी घेतला योगाचा ध्यास  

योग आणि माणुसकीचे धडे देण्यासाठी समाजकल्याण मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या अध्यक्षतेखाली योगप्रेमींनी स्थापन केलेल्या या अकादमीसाठी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, ग्रामीण विकास मंत्री जयेश साळगावकर हे आश्रयदाते आहेत. डॉ. सूरज काणेकर हे अकादमीचे योगगुरू म्हणून काम पाहतील. राज्यातील चाळीसही मतदारकेंद्रांत एक योग केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच, एक विशेष कोर्स सुरू करण्याचा अकादमीचा मानस असल्याचे मंत्री मडकईकर यांनी सांगितले.

अकादमीचा उद्देश

  राज्यभर योग प्रसार करणे                  

  शाळा, महाविद्यालये आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रशिक्षण देणे                  

  क्रीडा शिक्षक आणि शिक्षकांना प्रशिक्षण देणे                  

  प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करणे                  

  रोजगार निर्मितीक्षम प्रशिक्षण देणे                  

  निवासी योग शिबीर आणि कार्यशाळा आयोजित करणे                  

  सरकारी कर्मचारी, धार्मिक संघटना, क्रीडा आणि संस्कृती संघटना, स्वयंसाहाय्य गटांना प्रशिक्षण                  

  युवकांना वाममार्गापासून परावृत्त करणे                  

  गोवा स्वच्छ, प्लास्टिकमुक्त करणे

Top News

चारशे पदांना सरकारची मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील समितीचा निर्णय Read more

खाण प्रश्नाबाबतची बैठक लांबणीवर

अवलंबितांत निराशा; आमदारांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा Read more

आराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी

पाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. Read more

राज्यातील सर्व खाणी सुरक्षित

पावसाळ्यातील खाण सुरक्षेचा सचिवांकडून आढावा Read more