चार स्पीड रडार गन, १०० अल्कोमीटरची खरेदी

पोलिस महासंचालक डॉ. चंदर यांची माहिती

14th March 2018, 03:08 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता                        

पणजी : अतिवेगाने वाहन हाकणारे आणि मद्यपी चालकांनी आता सावध होण्याची वेळ आली आहे. गोवा पोलिसांनी चार स्पीड रडार गन आणि १०० अल्कोमीटर खरेदी केली आहेत. चारपैकी उत्तर गोव्यात दोन आणि दक्षिण गोव्यात दोन स्पीड रडार गन खरेदी करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त पोलिस खाते, वाहतूक पोलिस विभाग, तसेच राज्यातील इतर पोलिस स्थानकांना अल्कोमीटरही देण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिस महासंचालक डाॅ. मुक्तेश चंदर यांनी पोलिस मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.            

या पत्रकार परिषदेला वाहतूक विभागाचे पोलिस अधीक्षक दिनराज गोवेकर, वाहतूक पोलिस निरीक्षक ब्रॅडन डिसोझा व इतर कर्मचारी उपस्थित होते. अतिवेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांवर तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यासाठी या स्पीड रडार गन यंत्राचा पोलिस उपयोग करणार आहेत. मांडवी, झुआरीसह राज्यातील इतर पुलांवर, तसेच राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर वेगमर्यादा पाळली जावी यासाठी पोलिस तैनात राहणार आहेत. स्पीड रडार गनद्वारे वाहनाचा अचूक वेग नोंद केला जाणार आहे. नियम मोडणा‌ऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे, असेही महासंचालक चंदर यांनी सांगितले.  

अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांचा, तसेच मद्यपी चालकांचा परवाना जप्त करून  संबंधित विभागाला पाठविण्यात येणार आहे. मोटार वाहन कायदा १९८८ नुसार जप्त करण्यात आलेले वाहन परवाने कमीत कमी तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. 

— डॉ. मुक्तेश चंदर, पोलिस महासंचालक 

 स्पीड रडार गनद्वारे मंगळवारी दोनापावला ते बांबोळी महामार्गावर कारवाई करण्यात आली. यावेळी ४० हून ‌अधिक चालकांवर अतिवेगाने वाहन चालविल्याबद्दल कारवाई करण्यात आली. बुधवारपासून राज्यातील इतर चार ठिकाणी स्पीड रडार गनद्वारे वाहनांवर नजर ठेवली जाणार आहे. 

स्पीड रडार गनची वैशिष्ट्ये

  या यंत्रात कॅमेरा आणि वेग नियंत्रक बसविण्यात आला आहे.      

  तात्काळ छायाचित्र छपाईसाठी प्रिंटरची  सुविधा आहे.      

  हे यंत्र आॅटो आणि मॅन्युअल हाताळण्याची सुविधा आहे.      

  यंत्राद्वारे छायाचित्र टिपल्याची वेळ नोंदविली जाते.      

  वाहन क्रमांक पट्टीचे छायाचित्र ३०० मीटर अंतरावरून अचूक टिपता येते.      

  या यंत्रात ५.१ मेगापिक्सल आणि ४३२ एक्स झूमची सुविधा असणारा कॅमेरा आहे.      

  यंत्रात ५०० जीबी अंतर्गत मेमरी आहे.      

  ० ते ६० अंश सेल्सिअस तापमानातही हे यंत्र वापरता येते.      

  ‍कुठल्याही वाहनातून हाताळणी करता येते त्यामुळे वाहतुकीसाठी सुलभ आहे.

Top News

चारशे पदांना सरकारची मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील समितीचा निर्णय Read more

खाण प्रश्नाबाबतची बैठक लांबणीवर

अवलंबितांत निराशा; आमदारांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा Read more

आराडी-बांध येथील नळ कोरडे; मोर्चाची तयारी

पाणी विभागावर मोर्चा आणून अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. Read more

राज्यातील सर्व खाणी सुरक्षित

पावसाळ्यातील खाण सुरक्षेचा सचिवांकडून आढावा Read more