सावईवेरेत शुक्रवारपासून नाट्य-फिल्म महोत्सव

राजदीप नाईक यांची माहिती : कला चेतना वळवईचे आयोजन


14th March 2018, 03:06 am
सावईवेरेत शुक्रवारपासून नाट्य-फिल्म महोत्सव

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी : प्रेक्षकांची अभिरूची वाढविण्यासाठी कला चेतना वळवईने कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने सावईवेरे येथे दि. १६ ते २१ मार्च या काळात ९ वा ‘नाट्य-फिल्म महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजदीप नाईक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव विठ्ठल नाईक, कार्याध्यक्ष हनुमंत नाईक आणि विनंती कासार आदी उपस्थित होते.       

महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. १६ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, साहित्यिक पुंडलिक नाईक उपस्थित राहणार आहेत.  त्यानंतर कला अकादमी आयोजित शालेय एकांकिका स्पर्धेत बक्षीसपात्र तीन एकांकिकांचे सादरीकरण होणार आहे. यामध्ये प्रथम क्रमांकप्राप्त म्हार्दोळ येथील वागळे हायस्कूलची ‘रानमोनी आमी रानधनी’ ही कोकणी एकांकिका, द्वितीय पुरस्कारप्राप्त ‘एकरूप होऊ सगळे’ ही माराठी आणि ‘अस्मिताय’ ही कोकणी एकांकिका सादर केली जाणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.       

दि. १७ रोजी एकदंत कला संघ पंचवाडी दीपराज सातर्डेकर यांचे ‘सरण जळटाना’ हे नाटक सादर होणार आहे. दि. १८ रोजी मंगलमूर्ती कला बहार भिरोंडा-सत्तरीचे ‘अँड अ पॉयझन अॅपल फॉर मी प्लीज’ हे मराठी नाटक सादर केले जाईल. हे नाटक कला अकादमी मराठी ‘अ’ गट नाट्य स्पर्धेत विजेते ठरले होते. दि. १९ रोजी ‘निर्मोण’, दि. २० रोजी ‘हांव तु, तू हांव’ आणि दि. २१ रोजी ‘एनिमी’ चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे.    दरदिवशी हजार प्रेक्षक अपेक्षित

नाट्य-फिल्म महोत्सवाच्या निमित्ताने सादरीकरणानंतर कलाकार आणि तंत्रज्ञांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. महोत्सवासाठी दरदिवशी सुमारे एक हजार प्रेक्षकांची उपस्थिती अपेक्षित आहे, असेही राजदीप नाईक यांनी सांगितले.