विठ्ठल, अस्मिता निवडीची आज घोषणा

महापालिकेतील भाजप समर्थक गटाचा पाठिंबा; फुर्तादो दांपत्य तटस्थ


14th March 2018, 02:57 am
विठ्ठल, अस्मिता निवडीची आज घोषणा

प्रतिनिधी । गोवन वार्ता      

पणजी : महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्याने बाबूश मॉन्सेरात यांच्या गटाचे विठ्ठल चोपडेकर यांची महापौरपदी, तर अस्मिता केरकर यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झाली. निवडीची अधिकृत घोषणा बुधवारी होणार आहे.            

बाबूश मॉन्सेरात यांच्या गटाकडे १५ सदस्य आहेत, तर भाजप गटाकडे १३ सदस्य आहेत. महापौर सुरेंद्र फुर्तादो व त्यांच्या पत्नी नगरसेवक रूथ फुर्तादो तटस्थ आहेत. सुरेंद्र फुर्तादो यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज नेला होता; परंतु मंगळवारी त्यांनी तो दाखल केला नाही. बाबूश मॉन्सेरात यांनी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडलेले दोन्ही नगरसेवक नवखे आहेत. ते प्रथमच महापालिकेवर निवडून आल्याने त्यांना थेट संंधी दिल्यावरून मॉन्सेरात गटातील काही नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर होता. या संधीचा फायदा घेण्याची संधी भाजपकडे होती; परंतु मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने आणि एकूणच पक्षामध्ये उत्साह नसल्याने झाकली मूठ सव्वा लाखाची या उक्तीनुसार भाजप गटाने मॉन्सेरात समर्थकांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यात महापौर आणि उपमहापौर पदासाठी मोन्सेरात गटाकडून प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड निश्चित मानली जाते. या दोघांच्या निवडीची अधिकृत घोषणा बुधवारी होईल.       

आपण महापौर पदाचा ताबा घेतल्यानंतर काही गोष्टींचा अनुभव घेणार आहे. नगरसेवकांच्या सहकार्याने पणजीतील विकासकामे करणार आहे.  गेल्या दोन वर्षांत प्रभागांमध्ये काहीच कामे झालेली नाहीत. अाता बाबूश मॉन्सेरात यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा असून पणजीचे माजी आमदारही आम्हाला सहकार्य करतील. त्यामुळे पणजीचा विकास करणे सोपे होईल.

— विठ्ठल चोपडेकर, पणजी