पाचशे वर्षे एेसा नेता होणे नाही...

भाऊंच्या निधनानंतर डॉ. जॅक सिक्वेरा यांनी काढले होते भावोद्गार : एन. राधाकृष्णन यांचा शोधनिबंध एक बहुमूल्य दस्तावेज

Story: किशोर नाईक गांवकर |
12th August 2017, 12:22 am
पणजी : स्वतंत्र गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बाळकृष्ण बांदोडकर यांचे १२ आॅगस्ट १९७३ रोजी निधन झाले. भाऊसाहेबांचे कट्टर राजकीय विरोधक आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते डॉ. जॅक सिक्वेरा यांनी ‘पुढील ५०० वर्षे एेसा नेता होणे शक्य नाही' असे भावोद्गार काढले होते. भाऊंच्या निधनानंतर डॉ. सिक्वेरा यांनाही अश्रू आवरता आले नाहीत.
४५० वर्षांच्या पोर्तुगीज राजवटीतून मुक्त झालेल्या गोव्यात लोकशाहीची बीजे रोवतानाच या छोट्या आणि सुंदर गोव्याच्या भवितव्याचा भक्कम पाया रचल्यामुळेच गोव्याचे भाग्यविधाते ही पदवी भाऊंना प्राप्त झाली.
भाऊसाहेब बांदोडकर यांच्याबद्दल अनेकांनी लेखन केले आहे. अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत. दुर्दैवाने भाऊसाहेब बांदोडकर यांचे चरित्र मात्र प्रसिद्ध होऊ शकले नाही. भाऊसाहेबांच्या कन्या तथा माजी मुख्यमंत्री कै. शशिकला काकोडकर यांनी यासाठी बरेच प्रयत्न केले होते. ‘भाऊसाहेब बांदोडकर : आधुनिक गोव्याचे शिल्पकार' हा विषय घेऊन एन. राधाकृष्णन (गोवा राज्यपालांचे माजी सचिव) यांनी १९९४ मध्ये गोवा विद्यापीठातून पीएच.डी. पदवी प्राप्त केली होती. गोवा विद्यापीठाकडे सादर केलेल्या या ३०९ पानी संशोधनात्मक लिखाणाची प्रत अलीकडेच प्राप्त झाली. या शोध निबंधांतून एन. राधाकृष्णन यांनी अगदी जन्मापासून थेट मृत्यूपर्यंत भाऊसाहेब बांदोडकर यांचा जीवनपट उभा केला आहे. या शोध निबंधाच्या माध्यमाने भाऊसाहेब बांदोडकर यांचे व्यक्तिगत, राजकीय तथा एका सामाजिक क्रांतिकारकाचे रूप जनतेसमोर पोहोचले आहे. सर्वांगाने भाऊसाहेबांच्या कार्याची आेळख करून देणारा (पान ४ वर)
हा शोधनिबंध त्यांची खरी उंची स्पष्ट करून देणाराच ठरला आहे.
गोव्याचा राजकीय आणि सामाजिक इतिहास पडताळून पाहण्यासाठी प्रत्येक अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांनी हा शोधनिबंध नजरेखालून घालावा, असाच आहे. गोव्याच्या राजकारणावर दहा वर्षे मुख्यमंत्री म्हणून अनभिषक्त सत्ता गाजवलेल्या भाऊसाहेबांनी केलेल्या कार्याचा आलेख पाहिल्यानंतर त्यांच्याशी विद्यमान एखाद्या नेत्याची तुलना करणे म्हणजे सिंहासमोर बोक्याची प्रशंसा करण्यासारखेच होईल.
पारंपरिक रितीरिवाज आणि धार्मिक जोखडाखाली पिंजलेल्या, तसेच त्या काळात सामाजिक स्तरावर अत्यंत अपमानास्पदाची वागणूक मिळणाऱ्या गोमंतक मराठा समाजातून आलेल्या या सुपुत्राने आपल्या कार्यकर्तृत्वाने राज्याचे सर्वोच्च पद भूषविले. बहुजन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर मात्र एकाही बहुजन समाजाच्या नेत्याला ही उंची आणि कर्तृत्व गाठता आले नाही. सद्य:स्थितीत बहुजन समाजात अशा पद्धतीचा कुणी नेता तयार होईल, अशी शक्यता दृष्टिपथात नाही. भाऊसाहेबांनी राज्यासाठी दिलेल्या योगदानावर पांघरूण घालून नियोजित पद्धतीने त्यांच्या स्मृती पुसण्याचे प्रयत्न तर सुरू नाहीत, असा संशय घेण्यासारखी अवस्था आहे. भाऊसाहेबांचे खरे कार्य लोकांसमोर आणि विशेष करून नव्या पिढीसमोर पोहोचवून त्यांच्या मोठेपणाची आेळख करून देण्यात एन. राधाकृष्णन यांचा शोधनिबंध एक बहुमूल्य दस्तावेज ठरला आहे.
भाऊसाहेबांचे योगदान
विविध १३० कायदे सादर आणि मंजूर. (गोवा कृषी कूळ वहिवाट कायद्याचा समावेश)
 पणजी जिमखाना मैदान स्वखर्चाने उभारले.
 विविध क्रीडा प्रकारांना उत्तेजन, बक्षीबहाद्दर जीवबादादा केरकर पुरस्काराची घोषणा.
 १९६५ मध्ये क्रिकेट सामन्यातून प्राप्त झालेला एक लाखाचा निधी राष्ट्रीय सुरक्षा निधीसाठी देणगी.
 कांपाल इनडोअर संकुलाची पायाभरणी.
 पेडे क्रीडा संकुलासाठी भूसंपादन.
 गोवा दमण आणि दीव क्रीडा मंडळाची स्थापना.
 फातोर्डा बहुउद्देशीय मैदानाची संकल्पना.
 १९७२ मध्ये संतोष चषक सुरू.
 अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेसाठी सुवर्णचषक दान.
 कांपाल फुटबॉल मैदान, टिळक मैदान-वास्को आणि राजेंद्र प्रसाद स्टेडियम, मडगावची उभारणी.
 मुख्यमंत्री म्हणून मिळणारे वेतन गरजूंसाठी दान, सरकारी वाहन किंवा बंगल्याचा वापर नाही
 मुक्तीपूर्व १७६ सरकारी शाळांवरून ७१९ शाळांची स्थापना.
 १९६४ - ६५ मध्ये माध्यान्ह आहार योजना सुरू.
 गोवा कला महाविद्यालय, फर्मागुडी अभियांत्रिकी महाविद्यालय, गोवा मेडिकल कॉलेजचा दर्जा वाढवून मुंबई विद्यापीठाशी संलग्नता.
(पान ४ वर)
 साळावली, अंजुणे धरण, कला अकादमी, फर्मागुडी पर्यटन कुटिरे, संजीवनी साखर कारखाना.
- बोंडला आणि महावीर अभयारण्य.
- मांडवी, जुवारी पूल, मये तलाव.
- आग्वाद येथे ताज हॉटेल उभारणीसाठी टाटा ग्रुपकडे बोलणी.
- जुवारी अॅग्रो आणि सिबा कंपनी.
- राज्यात विविध ठिकाणी औद्योगिक केंद्रे.
- तिळारी पाटबंधारे प्रकल्पाचे नियोजन.