ते आले, ते बोलले, ते जिंकले


23rd February 2018, 03:08 am

किशोर नाईक गांवकर

गोवन वार्ता

पणजी : मुंबईतील लीलावती इस्पितळात उपचार सुरू असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळजीने संपूर्ण गोवा चिंताग्रस्त बनलेला असतानाच जनतेच्या या लाडक्या नेत्याने गुरुवारी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. इस्पितळातून डिस्चार्ज मिळताच विशेष विमानाने ते गोव्यात दाखल झाले आणि प्रकृती अस्वास्थ्याचा चक्रव्यूह भेदून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अर्थसंकल्प सादर करीत त्यांनी सर्वांचीच मने जिंकली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मुंबईत उपचार घेत असल्याने सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री या नात्याने मगोचे ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांना अर्थसंकल्प मांडण्याची सूचना केली होती. पण पर्रीकरांनी ज्याप्रकारे विधानसभेत दाखल होऊन अर्थसंकल्प सादर केला, तो घटनाक्रमच अचंबित करणारा ठरला. 

राज्य विधानसभा अधिवेशनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा गुरुवारचा शेवटचा दिवस होता. राज्याचे मुख्यमंत्री आजारी असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळातील अन्य मंत्री अर्थसंकल्प मांडण्याची वेळ राज्यावर पहिल्यांदाच ओढवणार होती. पण गुरुवारी सकाळपासून वेगळ्याच घटना घडू लागल्या. सरकार किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडिया आणि इतरत्र अफवांचे पेव फुटलेले होते. पर्रीकरांना पुढील उपचारांसाठी अमेरिकेत हलविण्याचीही चर्चा जोर धरू लागली होती. हे घडत असतानाच सकाळी प्रश्नोत्तराच्या तासाला अचानकपणे एक ट्विट आले. गोव्यात येण्यासाठी मनोहर पर्रीकर इस्पितळातून बाहेर पडले असून, विशेष विमानाने ते गोव्यात दाखल होतील, या आशयाचे ते ट्विट वाऱ्यासारखे राज्यभर पसरले. प्रश्नोत्तराच्या तासाला सभागृहातील काही आमदारांनाही याची कुणकुण लागली आणि सर्वत्र चलबिचल सुरू झाली.

प्रश्नोत्तराच्या तासावेळी काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी सहजपणे आपले मुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करण्यासाठी येत आहेत, असे सांगून टाकले. पण सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्काळ त्यांना चर्चेवेळी असे काही वक्तव्य करू नका, असे म्हणताच पुन्हा प्रश्नार्थक परिस्थिती निर्माण झाली. तोपर्यंत सोशल मीडियाने पर्रीकरांच्या आगमनाचे धावते वर्णनच सुरू केले. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यासाठी विशेष विमानाची सोय केली होती. डॉक्टरांचे पथक आणि कुटुंबियांसह ते दाबोळी विमानतळावर दाखल झाले आणि तेथून त्यांना थेट त्यांच्या दोनापावला येथील घरी नेण्यात आले. दुपारी २ वाजता पर्रीकर मंत्रिमंडळाच्या बैठकीचे नेतृत्व करणार असल्याची बातमी पसरली आणि हळूहळू विधानसभेच्या आवारात पत्रकार, फोटोग्राफर तसेच पोलिस फौजफाटा दाखल होऊ लागला. सर्वत्र एकच कुजबुज सुरू झाली. पर्रीकरांच्या चाहत्यांचे लोंढे सभागृहाकडे वळू लागले. गेले तीन दिवस सभागृहातील रिकाम्या असलेल्या गॅलऱ्या खचाखच भरून गेल्या. सगळ्यांच्या नजरा घड्याळ्याच्या काट्यांकडे खिळलेल्या दिसत होत्या. पोलिसांनी त्यांच्या आगमनासाठीची लगबग सुरू केली. पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग तसेच अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारीही तेथे दाखल झाले.   

आपल्या या लाडक्या नेत्याला रोज पाहण्याची सवय जडलेल्यांच्या नजरा त्यांचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक होत्या. तसे कसे असतील, ते चालून येतील की त्यांना व्हीलचेअरवरून आणले जाईल, निदान त्यांना पाहण्याची तरी संधी मिळेल का, असे अनेक प्रश्न मनात घेऊन अनेकांची प्रवेशद्वारावर जागा अडवण्याची धडपड सुरू झाली होती. वाहनांचे ताफे येण्यास सुरुवात झाली, तसा संपूर्ण विधानसभा संकुलाचा परिसरच जणू त्यांचे दर्शन घेण्यासाठी आसुसलेला दिसत होता. विधानसभा संकुलाच्या खिडक्या, दरवाजांवर आमदार, कर्मचारी उभे राहून त्यांना पाहण्यासाठी धडपडत होते. पर्रीकरांचे मंत्रिमंडळ सहकारी बाहेर येऊन त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. शेवटी पोलिस पायलट वाहनाने सायरन वाजवत विधानसभा संकुलात प्रवेश केला. गेले तीन दिवस १३१३ क्रमांकाची जी गाडी कुठेच दिसली नव्हती, ती मागोमाग येत होती. ती विधानसभेच्या प्रवेशद्वारावर दाखल झाली आणि गाडीचा पुढचा दरवाजा उघडून आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये पर्रीकर गाडीतून उतरले. निळ्या रंगाचा फूल स्लीव्हज शर्ट आणि करड्या रंगाची पँट घातलेले पर्रीकर खाली उतरले. पाठीमागे त्यांचे पुत्र उत्पल आपल्या बाबांच्या पाठीमागे उभे होते. आजारपणामुळे चेहऱ्यावरील थकवा स्पष्टपणे जाणवत होता, पण विधानसभेत पोहोचताच तो दूर झालेला दिसला. प्रचंड आत्मविश्वास आणि आरोग्यासाठी लोकांच्या प्रार्थनांनी भारावून गेलेले पर्रीकर हात जोडून आणि सर्वांना स्मितहास्य देत विधानसभेतील आपल्या दालनात दाखल झाले. तेथे सर्व मंत्रिमंडळ सदस्य हजर होते. सर्वांनी नमस्कार करीत त्यांचे स्वागत केले. आपल्या नेत्याला पाहिल्यानंतर ते सुखावले. मुख्य सचिवांच्या उपस्थितीत वित्त सचिवांनी अर्थसंकल्पाची माहिती मंत्रिमंडळ सदस्यांना दिली. आरोग्याच्या प्रश्नामुळे पूर्ण अर्थसंकल्प सादर करणे शक्य होत नसल्याने अंतरिम अर्थसंकल्प सादर करीत असल्याचे पर्रीकरांनी सहकाऱ्यांना सांगितले.

दुपारी तीन वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होणार होते. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व मंत्री सभागृहात पोहोचले. उर्वरित आमदारांचेही आगमन झाले. विरोधी बाकांवरील सदस्यांनाही मुख्यमंत्र्यांना पाहण्याची तीव्र इच्छा झाली होती. खचाखच भरलेल्या गॅलऱ्यांतील लोकांच्या नजराही त्यांच्या आगमनाकडे होत्या. तोच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचे आगमन झाले. सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून, तर गॅलऱ्यांतील लोकांनी टाळ्यांनी त्यांचे स्वागत केले. तीन दिवस रिकामी दिसणारी खुर्ची आपल्या मालकाच्या स्पर्शाने सुखावली, असेच चित्र दिसत होते. सभागृहात शांतता पसरली. सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या आगमनाची घोषणा झाली. तोच माजी मुख्यमंत्री आणि सभागृहातील सर्वात ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे उठले आणि त्यांनी मुख्यमंत्री पर्रीकरांना दीर्घायुष्याचे आशीर्वाद दिले. चर्चिल आलेमाव यांनीही पर्रीकरांना लवकर बरे व्हा, असे सांगितले. पर्रीकरांनी या दोन्ही नेत्यांना धन्यवाद दिले. त्यानंतर सभापती डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी दिली.

आगमन...टाळ्या...अन् पाणावलेल्या कडा 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सभागृहात दाखल होताच सर्व सदस्यांनी बाके वाजवून आणि गॅलरीतील लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. पर्रीकर खुर्चीवर विराजमान होताच त्यांनी सभोवताली कटाक्ष टाकला. आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी गॅलरीत जमलेल्या लोकांसाठी हा कटाक्ष सुखद ठरला, नकळतपणे त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. मुख्यमंत्री शांत वाटत होते. अर्थसंकल्पीय भाषणही त्यांनी थोडक्यात आटोपले. शेवटी समारोपाला राष्ट्रगीतावेळीही ते पुटपुटले आणि आपल्या घरी जाण्यासाठी बाहेर पडले. 

मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पेलणार 

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पूर्ण बरा होण्यासाठी डॉक्टरांनी आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपायांचा सल्ला दिला आहे. या काळात लोकांशी आपला संपर्क मर्यादित असेल. पण राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नियमित काम आणि जबाबदाऱ्या आपण पेलणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांच्या आरोग्याबाबतच्या वावड्या आणि नेतृत्व बदलाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 

राज्य, देशाच्या सेवेसाठी कटिबद्ध

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, आजारपणाच्या काळात आपल्याला पाठविलेले संदेश, पत्रे तसेच लोकांनी मी बरा व्हावा, यासाठी विविध मंदिरे, चर्च आणि मशिदींमध्ये केलेल्या प्रार्थना कामी आल्या. त्यामुळेच माझ्या आरोग्यात सुधारणा झाली. लोकांनी दाखविलेले प्रेम, माया यामुळे मी भारावून गेलो आहे. गोवा आणि गोंयकार हे माझे कुटुंबच आहे, असे मी मानतो. राज्य तसेच देशाच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध असेन, असेही त्यांनी नमूद केले.

घटनाक्रम

सकाळी ११.४० : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचे विशेष विमानाने दाबोळी विमानतळावर आगमन

१२.१० : दोनापावला येथील आपल्या घरी गेले

२.०५ : पर्वरीतील विधानसभा संकुलाकडे रवाना

२.२५ : विधानसभा संकुलात दाखल

२.४५ : मंत्रिमंडळ बैठक

३.०० : विधानसभा सभागृहात दाखल

३.०५ : अर्थसंकल्पीय भाषण सुरू

३.११ : भाषण समाप्त

३.३० : विधानसभेतून घरी रवाना   

हेही वाचा