कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयोग स्थापन करावा

कामगार नेते अजितसिंग राणे यांची मागणी


23rd February 2018, 03:59 am
कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयोग स्थापन करावा


                            

प्रतिनिधी : गोवन वार्ता                                                            

पणजी : राज्यातील कामगार आणि बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने एका स्वतंत्र आयोगाची स्थापन करावी, अशी मागणी गोवा ट्रेड युनियन महासंघाचे नेते अॅड. अजितसिंग राणे यांनी गुरुवारी आझाद मैदान येथे पत्रकारांशी बोलताना केली. यावेळी कामगार नेत्या स्वाती केरकर यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                             

या आयोगावर मुख्यमंत्री, कामगार मंत्री आणि कामगार आयुक्त यांचाही सहभाग  असावा. त्यांनी कामगारांच्या मागण्या ऐकून घ्यावात, अशी मागणी करत राणे  म्हणाले की, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण महिनाभर चालणार होते. परंतु, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधिवेशनाचा काळ कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.  मुख्यमंत्री आजारी असताना विधानसभेवर मोर्चा काढणे योग्य वाटत नाही. त्यामुळे सरकारने महिनाभरानंतर पुन्हा एकदा स्वतंत्र अधिवेशन बोलवावे. त्यामध्ये राज्यातील बेरोजगारी आणि कंपन्यांकडून होणारी कामगारांची होणारी छळवणूक या विषयावर चर्चा करावी.

 मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यामुळे राज्यातील आद्योगिक क्षेत्रात सध्या भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. कामगारांची कपात करत आहेत. याला मुख्यमंत्री पर्रीकरच जबाबदार आहेत, असा आरोप राणे यांनी यावेळी केला. दरम्यान, कामगारांचे प्रश्न सुटले नाही तर पुढील काळात महासंघातर्फे मोठे आदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती केरकर यांनी दिली.