थकीत भाडे : दुकानांना टाळे

वाळपई पालिकेची कारवाई : पंधरा दिवसानंतर जप्तीची कारवाई करणार


23rd February 2018, 03:58 am



प्रतिनिधी। गोवन वार्ता                        

वाळपई :  वाळपई नगर पालिकेच्या मार्केट प्रकल्पातील भाडे न भरलेल्या दुकानांवर कारवाई करत नगर पालिकेने टाळे ठोकले. तरीही संबंधित दुकानदारांनी भाडे भरलेले नाही. अशा दुकानदारांना आता पालिकेने शेवटची पंधरा दिवसांची मुदत दिली आहे.                         

पंधरा दिवसांत ही रक्कम न भरल्यास सबंधित भाडेकरूची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अंतिम असून कायद्यानुसार होणार आहे, अशी माहिती वाळपई नगराध्यक्ष परवीन शेख यांनी दिली. यामुळे थकीत भाडेकरूंना आता नगर पालिकेच्या धाडसी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून केलेल्या कारवाईच्या माध्यमातून नगर पालिकेने ११ लाखांची वसुली करण्यात यश मिळवले आहे. यामुळे नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थिती काही प्रमाणात मजबूत होण्यासाठी मदत होणार 

आहे.                              

एक महिन्यापूर्वी नगरपालिकेच्या बाजारातील मार्केट प्रकल्प व नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतींमध्ये इच्छुक लोकांना लिलाव पद्धतीने दुकाने भाड्याने देण्यात आली होती. 

यामुळे नगरपालिकेच्या तिजोरीला चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून मार्केट प्रकल्प व 

एक वर्षापासून प्रशासकीय इमारतीमधील दुकानांचे भाडे येणे बंद झाले आहे. विशेष म्हणजे जास्तीत जास्त दुकानदारांनी भाडे न भरल्याने याचा ताण पालिकेच्या तिजोरीवर आला. त्यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती कमजोर बनली. यामुळे वाळपई नगर पालिकेच्या यंत्रणेने थकलेल्या भाडे वसुलीसाठी अनेक वेळा सबंधितांशी पत्रव्यवहार केला. मात्र याला अनेक भाडेकरूंनी केराची टोपली दाखविली. यामुळे नाईलाजास्तव नगरपालिकेने शेवटची नोटीस बजावली व टाळे ठोकण्याची कारवाई केली.  

अनेक दुकानदारांकडून थकबाकी येणे     

आता काही दुकानदारांनी आपली थकबाकी भरली असली तरी अनेक दुकानदारांकडून थकबाकी येणे आहे. त्यांना ही थकबाकी भरण्यासाठी नगरपालिकेने अजूनही भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. यावेळी त्यांनी ती न भरल्यास मात्र नगरपालिका त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मोकळी आहे, असे नगराध्यक्ष परवीन शेख यांनी दिली. थकीत भाड्याची रक्कम वसूल करण्यासाठी मालमत्ता जप्तीसारख्या प्रसंगानाही तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत संंबंधितांनी ती भरावी, असे आवाहनही नगराध्यक्ष शेख यांनी केले. 

कारवाईच्या भीतीने दुकानदारांची धावपळ 

या कारवाई सुमारे २८ पेक्षा जास्त दुकानांना टाळे ठोकण्यात आले.  पालिकेने केलेल्या कारवाईनंतर दुकानदारांमध्ये खळबळ उडाली. काहीनी सदर रक्कम भरण्यासाठी धावाधाव केली. यामुळे नगरपालिकेच्या तिजोरीत ११ लाखांचा महसूल जमा झाला आहे. यामुळे अनेक स्तरावर नगरपालिकेला विकासकामे हाती घेण्यासाठी महत्त्वाची मदत झाली आहे.