पंचायत क्षेत्रात कचरा प्रकल्प कशाला ?

सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस यांचा प्रश्न


23rd February 2018, 02:41 am
पंचायत क्षेत्रात कचरा प्रकल्प कशाला ?

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : कुडचडे व वेर्णा येथे दोन मोठे अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प होत असताना सर्व पंचायत क्षेत्रांत वेगळे प्रकल्प कशाला हवेत, असा प्रश्न आमदार टोनी फर्नांडिस यांनी उपस्थित केला. आपल्या सांताक्रूझ मतदारसंघात जागाच उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायत क्षेत्रात कचरा प्रक्रिया प्रकल्प आणण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी त्यांनी 

केली.            

या प्रश्नाला उत्तर देताना पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले की,  दोन मोठे प्रकल्प येत असताना प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात प्रकल्पासाठी जागा पाहण्यासाठी का सांगण्यात येत आहे, हा प्रश्न मलाही पडला होता. परंतु मोठे प्रकल्प सुरू होण्यासाठी  किमान दोन-तीन वर्षे लागणार असल्याने तोपर्यंत कचरा व्यवस्थापन करण्यासाठी पंचायत क्षेत्रात प्रकल्प हवे आहेत. गोव्यात केवळ ५५ ठिकाणी कचरा प्रकल्पासाठी जागा पाहिली आहे. याचे कारण जागेची अनुपलब्धता हे आहे.            

पंचायतींना कचरा प्रक्रियेसाठी देण्यात येणारा २ लाख रुपयांचा निधी हा अपुरा असल्याचे मत फर्नांडिस यांनी मांडले. याला उत्तर देताना मंत्री गुदिन्हो म्हणाले, हा निधी यापूर्वी केवळ ५० हजार रुपये होता, तो आमच्या सरकारने आता २ लाख रुपये केला आहे. पंचायतीच्या क्षमतेनुसार तीन विभागांत ५ ते ७ लाख रुपयांचा निधी पंचायतींना कचरा व्यवस्थापनासाठी देण्यात येतो. आणखी फंडाची उपलब्धता व्हावी यासाठी पंचायत खाते प्रयत्न करत आहे; परंतु ग्रामपंचायती व स्थानिक आमदारांनी स्वतः त्यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी सांगितले.