सांताक्रूझमधील काही जागा ‘नो डेव्हलपमेंट झोन’ करू

नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांचे आश्वासन


23rd February 2018, 03:39 am
सांताक्रूझमधील काही जागा ‘नो डेव्हलपमेंट झोन’ करू

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : ग्रेटर पणजी पीडीएला विरोध हा बाबूश मॉन्सेरात यांना सांताक्रूझ मतदारसंघापासून दूर ठेवण्यासाठी होत आहे. त्याला घाबरून सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी पीडीए सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती  शून्य तासावेळी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री विजय सरदेसाई यांनी दिली.

सांताक्रूझचे आमदार टोनी फर्नांडिस म्हणाले, गेली तीन दशके मतदारसंघाचा विकास झाला नसल्याने आपला पीडीएला पाठिंबा होता; परंतु नागरिकांनी त्याला विरोध केल्याने त्यांच्यासोबत राहणे माझे कर्तव्य आहे. ग्रेटर पणजी पीडीएची घोषणा झाल्यानंतर नागरिकांचा विरोध वाढत आहे. त्यामुळे पीडीएसंदर्भात काढलेली अधिसूचना त्वरित  रद्द करावी. बाेंडवेल तळ्याच्या ठिकाणी एका व्यक्तीने बेकायदेशीर रस्ता केला असून त्याच्यावर गुन्हा नाेंद झाला आहे. त्याच्यावर पुढील कारवाई करावी, अशी मागणीही फर्नांडिस यांनी केली.             

सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनीही आपल्याला पीडीएबाबात योग्य माहिती नसून मंत्र्यांनी एक बैठक घेऊन त्यासंदर्भात माहिती द्यावी, अशी मागणी केली. त्यावर मंत्री सरदेसाई यांनी आपण तयार असल्याचे सांगितले.  

आमदारांनी लोकांची समजूत काढावी : सरदेसाई

मंत्री विजय सरदेसाई म्हणाले, ग्रेटर पणजी पीडीएमधून सांताक्रूझचा काही भाग वगळता येणार नाही. मात्र पर्यावरण संवेदनशील परिसर ‘नो डेव्हलपमेंट झोन’ करू. आंदोलन करणा‌ऱ्यांचे एकही निवेदन माझ्यापर्यंत पोहोचलेले नाही. सांताक्रूझ परिसर पीडीएमध्ये घेण्याचा निर्णय घाईगडबडीत झालेला नाही. आमदारांशी चर्चा करूनच त्याचा समावेश पीडीएमध्ये केला आहे. त्यामुळे आमदारांनी लोकांना समजावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन मंत्री सरदेसाई यांनी केले.