बेकायदा मासळी विक्रेत्यांमुळे व्यवसायावर परिणाम

 बायणातील मासळी विक्रेत्यांची नगराध्यक्षाकडे कारवाईची मागणी

11th August 2017, 04:51 Hrs

प्रतिनिधी
गोवन वार्ता
वास्को : बायणा मासळी मार्केटमधील विक्रेत्यांनी गुरुवारी सकाळी आपला व्यवसाय बंद ठेवून मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. बायणा युथ रिक्रेशनल क्लबसमोरच्या रस्त्यावर अतिक्रमण करून बेकायदा मासळी विकणाऱ्या विक्रेत्यांमुळे आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला असल्याचे यावेळी या विक्रेत्यांनी सांगितले.
याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन नगराध्यक्ष नाईक यांनी दिले. तसेच बेकायदा मासळी विक्रेत्यांची माहिती आपल्याला मोबाईलवर द्या, असे आवाहन केले.
बायणा युथ रिक्रेशनल क्लबसमोरच्या रस्त्यावर अतिक्रमण करून तेथे मासळी विकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. तसेच ओल्ड पॉवर हाऊस येथेही रस्त्यावर अतिक्रमण करून मासळी विकण्यास काही महिलांनी आरंभ केला आहे. त्यांना तेथून हुसकावून लावण्यासाठी मार्केटातील विक्रेत्यांना आपला व्यवसाय बंद ठेवून तेथे धाव घ्यावी लागते. यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.
रस्त्यावर बसणाऱ्या मासळी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी यासाठी मार्केटातील विक्रेत्यांनी यापूर्वीही मुरगावचे नगराध्यक्ष नाईक यांची भेट घेतली होती. त्यानंतर एक दोनदा त्यांच्यावर कारवाई झाली होती. परंतु, आता पुन्हा त्या विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करून मासळी विकण्यास आरंभ केला आहे.
त्यामुळे ग्राहक मार्केटात फिरकत नसल्याचा दावा विक्रेत्यांनी केला. व्यवसायावर परिणाम होऊ लागल्याने त्या विक्रेत्यांनी गुरुवारी नगराध्यक्ष नाईक यांची पुन्हा भेट घेऊन रस्त्यावर मासळी विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
बायणा मार्केटात ग्राहकांची संख्या कमी
बायणा मासळी मार्केटात पूर्वी बारा ते पंधरा विक्रेत्या होत्या. परंतु, रस्त्यावर अतिक्रमण करून तेथे मासळी विकणाऱ्यांमुळे बायणा मासळी मार्केटात येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होऊ लागल्याने मार्केटातील मासळी विक्रेत्यांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. आता विक्रेत्यांची संख्या पाचवर आली असून त्यांनाही ग्राहकांची वाट पाहावी लागते.