नऊ हजारांपेक्षा जास्त वाहन चालकांवर कारवाई


20th February 2018, 07:10 am

पणजी : वाहतूक पोलिस विभागाने दि. ६ ते ११ फेब्रुवारीपर्यंत रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित केला होता. या कालावधीत विभागाने विविध वाहतूक उल्लंघन केल्या प्रकरणी ९,१४१ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. राज्यात अपघाती मृत्यूत वाढ होत असल्याने तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी  वाहतूक विभागाने अनेक मोहीम राबवली आहे. या व्यतिरिक्त गोवा पोलिसांनी राज्यातील किनारी भागात वाहतूक पोलिस विभाग, दहशतवाद विरोधी पथक, गुन्हा अन्वेषण विभाग, स्थानिक पोलिस तसेच इतर पोलिस विभाग मिळून संयुक्त कारवाई सुरू केली आहे.             वाहतूक पोलिस विभागाने वरील कालावधीत सर्वात जास्त हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वार, नो पार्किंग नियम उल्लंघन करणारे, नो एन्ट्रीचे उल्लंघन करणारे, दोन पेक्षा जास्त दुचाकीवर बसवल्यामुळे, धोकादायक पार्किंगसाठी, वाहनांना काळ्या काचा लावल्या प्रकरणी तसेच इतर वाहतूक नियम उल्लंघन केल्यामुळे ९,१४१ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.