फसवणुकीच्या दोन प्रकरणांत नऊ जणांवर गुन्हे

आर्थिक गुन्हा विभागातर्फे तपास सुरू : सुमारे ११.८० कोटींची फसवणूक


20th February 2018, 06:08 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता             

पणजी : जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक व बनावट दस्तावेज तयार करुन फसवणूक करणे या दोन प्रकरणांतून ११ कोटी ८० लाख २४ हजार ५७७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाने ९ जणांविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. 

आर्थिक गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वास्को येथील सहारा इंडिया शाखेचे व्यवस्थापक वाय. रघुवीर, कॅशियर के. वाय. शरीफ आणि एम. डी. जाकीखान या तिघांनी षड्‌यंत्र रचून १३ एप्रिल २०१३ ते २० मे २०१६ या कालावधीत अस्तित्वातच नसलेल्या खातेधारकांचे बनावट दस्तावेज तयार करून गैरव्यवहार केला. यातून त्यांनी कंपनीची ६ कोटी ६९ लाख ६६ हजार ७७ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी हैद्राबाद येथील सहारा इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख ए. के. त्रिपाठी यांनी आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन विभागाने वरील तिघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४२० ४६५,४६८, ४७१, १२० नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते तपास करत आहेत.        

गुंतवणूकदारांना १२ सप्टेंबर २०१४ रोजीपासून  पाच टक्के व्याजाचे आमिष दाखवून अक्रोस द ग्लोब हाॅस्पिटॅलिटी लिमिटेड आणि एफ. एक्स. पी. फिनकोन प्रा. लि. या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्यांविरोधातही आर्थिक गुन्हा विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी गुंतवणूकदारांची ५ कोटी १० लाख ५८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विभागाने सुभाष पाटील (वय ३८, सांगोल्डा), कानुट डिसोझा (वय ४९, वागातोर- बार्देश), नितीन बांदोडकर (वय ४०, धारगळ- पेडणे), डेल्सी बोर्जिस (वय ३०, आके - मडगाव), मारिया धावजेकर (वय ६३, गौवरावाडो- कळंगुट) आणि दिगंबर सांगोडकर यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४२०, १२० बी आणि ३ व ५ गोवा गुंतवणूकदारांचे हितरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हा विभागाचे निरीक्षक प्रज्योत फडते यांनी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा