कुडका येथील ट्रक अपघातात तिघे जखमी


20th February 2018, 06:08 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी : ब्रेक निकामी झालेल्या चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकने सातांन कुडका येथे समोरील ट्रकाला धडक दिली. त्यानंतर हे दोन्ही ट्रक रस्त्याबाजूला एकमेकांवर पडले. यात तिघेजण जखमी झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अडकलेल्या तिघांना गाडीबाहेर काढले. जखमी झालेल्या तिघांनाही बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात उपचार करून घरी पाठविण्यात आले.

आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी साडेबारा वाजता जुने गोवा येथून सातांन - तळावलीच्या दिशेने जाणाऱ्या चिरेवाहू ट्रकचे (जीए ०१ डब्ल्यू ७२३२) ब्रेक सातांन कुडका येथील उतारावर निकामी झाले. त्यामुळे या चिरेवाहू ट्रकने त्याच्या समोरील ट्रकला (जीए ०७ एफ  ५२२४) मागून धडक दिली. यामुळे दोन्ही ट्रक रस्त्याबाजूच्या झाडीत एकमेकांवर पडले. 

या अपघातात दोन्ही ट्रकचे चालक व एक क्लिनर गाडीत अडकले. नागरिकांनी या अपघाताची माहिती पोलिस तसेच अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर जुने गोवा अग्निशामक दलाचे जवान तसेच आगशी पोलिस स्थानकाचे हवालदार अभय देवजी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी चिरेवाहू ट्रकामध्ये फसलेल्या चालक संकमेश चिनप्पा (वय २३, उसगाव तिस्क) आणि क्लिनर देमन्ना बस्सप्पा (वय ३०, तिस्क उसगाव) आणि दुसऱ्या ट्रकचा चालक शिवप्पा जेडी (वय ५५, धारबांदोडा) या तिघांना जखमी अवस्थेत गाडीबाहेर काढले. तिघांनाही बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात उपचार करून सायंकाळी घरी पाठविण्यात आले. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले.               

आगशी पोलिस निरीक्षक उदय गावडे याच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अभय देवजी या प्रकरणी तपास करत आहेत.