सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरविणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल


20th February 2018, 08:07 am


प्रतिनिधी। गोवन वार्ता             

फोंडा : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारासंदर्भात  खोट्या बातम्या पसरविण्याच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तीविरुद्ध फोंडा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.            

फोंडा पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, सुनील देसाई यांनी या  संदर्भात तक्रार केली होती.  काही लोक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्याविषयी खोट्या बातम्या प्रसारित करत आहेत. त्यासाठी आपले नाव वापरले जात असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. या खोट्या बातम्या १७ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आल्या होत्या. व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियावर या खोट्या बातम्या  प्रसारित झाल्या होत्या, असे भाजपचे नेते सुनील देसाई यांनी 

सांगितले.            

पोलिस निरीक्षक हरीश मडकईकर यांनी सांगितले की, या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. सुनील देसाई यांनी सांगितले की, हा गंभीर अपराध असून गुन्हेगारांना शिक्षा व्हायला हवी. हे एखाद्या सामान्य माणसाबरोबर घडू नये. यासाठी सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने केला पाहिजे, असे देसाई म्हणाले. 

यापूर्वी सोशल मीडियाशी संबंधित तक्रारी सायबर क्राईम विभागाला हस्तांतरित करण्यात येत होत्या. मात्र, या प्रकरणाचा तपास फोंडा पोलिसांतर्फे केला जात आहे. यावर अशा प्रकरणांचा तपास आम्ही करू शकतो. काहीवेळी सायबर क्राईम विभागाची मदत घेतो, असे मडकईकर यांनी सांगितले.