सासष्टीतील बहुतांश ग्रामसभांत अर्थसंकल्पावर चर्चा

सासष्टी तालुक्यातील विविध पंचायतींच्या ग्रामसभा रविवारी पार पडल्या.


19th February 2018, 03:57 am

सासष्टीतील बहुतांश ग्रामसभांत अर्थसंकल्पावर चर्चा

प्रतिनिधी । गोवन वार्ता          

मडगाव : सासष्टी तालुक्यातील विविध पंचायतींच्या ग्रामसभा रविवारी पार पडल्या. बहुतांश ग्रामसभांमध्ये आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा 

झाली. 

सरकारकडून पंचायतींमध्ये अर्थसंकल्पाच्या नियोजनासाठी एक परिपत्रक पाठविले होते. त्या परिपत्रकानुसार पंचायतींनी आपला अर्थसंकल्प तयार केला आहे. मात्र चांदोरच्या पंचायतीत अर्थसंकल्पाच्या आकडेवारीत बऱ्याच प्रमाणात चुका आढळल्याने त्या पंचायतीच्या अर्थसंकल्पावर चर्चा होऊ शकली नाही. 

सासष्टी तालुक्यातील राया, वार्का, चांदोर, गर्दोली, कुडतरी, राशोल, नुवे, माकाझन, दिकरपाली, रुमडामळ-दवर्ली या पंचायतीत रविवारी ग्रामसभा पार पडल्या. 

राय ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा


राय पंचायतीच्या सरपंच झेलिया मारिया लुर्दीस गोन्साल्वीस यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसभा पार पडली. या पंचायतीत सर्वप्रथम जनमत कौलाचे नेते तथा युनायटेड गोवन्सचे जॅक सिक्वेरा यांचा पुतळा पर्वरीतील विधानसभा संकुलात उभारण्यात यावा याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. नंतर गावातील विकासकामे गटार बांधणी, रस्त्यांची डागडुजी व इतर नवीन प्रकल्पांबाबत चर्चा झाली. त्यानंतर अर्थसंकल्पावर सखोल चर्चा करण्यात 

आली.


वार्का ग्रामसभेत गॅस पुरवठा समस्येवर चर्चा


ग्रामसभा पार पडली. वार्का परिसरात घरगुती वापराच्या गॅस पुरवठ्याबाबत लोकांसमोर मोठी समस्या निर्माण झालेली आहे. या भागात एचपी व भारत पेट्रोलियम या दोन कंपन्याकडून गॅसचा पुरवठा केला जातो. भारत गॅस कंपनीची सेवा चांगली असून लोकांना सुरळीतपणे गॅस सिलिंडर्सचा पुरवठा होत असतो. मात्र एचपी गॅस कंपनीकडून लोकांना घरोघरी सुरळीतपणे गॅस सिलिंडर्सचा पुरवठा होत नाही. याबाबत वार्काच्या ग्रामसभेत बरीच चर्चा झाली. 

वार्का परिसरात एचपी गॅस कंपनीचे गॅस सिलिंडर्स बंद करून सर्व लोकांना भारत पेट्रोलियम कंपनीकडून गॅस सिलिंडर्सचा पुरवठा करण्यात यावा असा ठराव वार्काच्या ग्रामसभेत मंजूर करून घेण्यात आला. त्यानंतर गावातील विकासकामांबद्दल चर्चा करण्यात आली.

चांदोर ग्रामसभेत 

अर्थसंकल्पाला अाक्षेप

चांदोर पंचायतीची ग्रामसभा सरपंच सेलिना फुर्तादो यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या ग्रामसभेच्या सुरुवातीला लेखा अहवाल मंजूर करून घेण्यात आला. त्यानंतर सरकारकडून अर्थसंकल्प तयार करण्यासाठी पाठविलेल्या परिपत्रकावर चर्चा झाली असता अर्थसंकल्पाच्या आकडेवारीत बऱ्याच चुका सापडल्या. त्यामुळे लोकांनी चांदोर पंचायतीच्या अर्थसंकल्पाला आक्षेप घेतला. पंचायतीचे वार्षिक उत्पन्न व खर्च यात बराच फरक आढळून आला. तसेच सरकारकडून पंचायतीला विकासकामांसाठी वर्षाकाठी ५ लाख रुपये दिले जाते. तर चांदोर पंचायतीच्या अर्थसंकल्पाच्या नियोजनात ५ लाखांऐवजी २ लाख दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांनी चांदोर पंचायतीच्या अर्थसंकल्प चर्चेला कडाडून आक्षेप घेतला. नंतर सरपंच फुर्तादो यांनी अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलाविण्याचे आश्वासन दिले. कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस चांदोर पंचायतीच्या ग्रामसभेला उपस्थित होते. ग्रामसभेत त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले.

 गिर्दोली, कुडतरी, राशोल, नुवे, माकाझन, दिकरपाली, व रुमडामळ-दवर्ली या पंचायतीत झालेल्या ग्रामसभांमध्ये पंचायतीचे प्राप्त होणारे वार्षिक उत्पन्न व सरकारकडून विकासकामांसाठी मिळणारा निधी एकत्र करून विकासकामे कशा प्रकारे करता येईल, तसेच प्रत्येकी प्रभागात किती प्रमाणात निधी खर्चून विकास करता येईल, यावर विस्तृत चर्चा झाली. कुडतरी, नुवे व दिकरपालच्या ग्रामसभेत लोकांनी अर्थसंकल्पावर चर्चा करताना पंचायत मंडळाला बरेच धारेवर धरले. तर इतर पंचायतीच्या ग्रामसभांमध्ये लोकांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेला अनुमती दर्शविली.    

===============