टँकर चालकांची मनमानी

लोकांची तक्रार : अंतर्गत भागात पाणी पुरवठा नाही​


19th February 2018, 03:57 am


वार्ताहर। गोवन वार्ता      

हरमल : येथील पंचायत क्षेत्रात होणारा पाणीपुरवठा टँकर चालकांच्या मनमानी कारभारामुळे खर्चिक बनला आहे. अंतर्गत भागातील घरांना या पाण्याचा लाभ होत नाही. मात्र लोकांच्या नावांची नोंद करून पाणी पुरवठा केल्याचे सांगून फसवणूक केली जात आहे. याबाबत संबंधित टँकर चालकांना जाब विचारावा, अशी मागणी​ करणारा ठराव हरमल ग्रामसभेत मंजूर करण्यात 

आला.      

पंचायत संचालनालयाने पाठविलेले परिपत्रक हे ग्रामसभेच्या अधिकारांचे खच्चीकरण करणारे आहे. हरमल ग्रामस्थांतून या धोरणाला तीव्र विरोध होत आहे. गावांच्या उत्कर्षासाठी ग्रामस्थ ग्रामसभेद्वारे ठराव व सूचना मांडून विकास साधत असतात. परंतु सरकार अशा परिपत्रकाद्वारे नेमके काय साध्य करू पाहत आहे? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. अशा परिपत्रकांपेक्षा ग्रामसभाच घेऊ नये, असा ठराव यावेळी घेण्यात आला. म्हादईचे पाणी कर्नाटक राज्यात वळविण्यास विरोध करणारा ठरावही माजी सरपंच रामचंद्र केरकर यांनी केला. 

रस्ता रुंदीकरणाची​ गरज आहे. परंतु फुटपाथ बनविण्यासाठी लोकांच्या तुळसी वृंदावन, दगडी कुंपण ताेडून विकास करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न संजय नाईक यांनी केला. यावर याप्रश्नी पंचायत हस्तक्षेप शकत नाही, असे सरपंच अनंत गडेकर यांनी स्पष्ट केले. 

दुकानदारांनी सामान ठेवल्याने फुटपाथवर अतिक्रमणे केलेली आहेत. तसेच सेंट अँथनी कपेलच्या बाजूचा अर्धवट स्थितीतील फुटपाथ दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिक टॉन डिमेलो व दिलीप वस्त यांनी यावेळी 

केली. मांद्रे किनारी भागात वेश्या व्यवसाय व अमली पदार्थ विक्रीचे व्यवहार जोरदारपणे चालत असून त्यांच्याविरुद्ध आवाज उठविल्याबाबत मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांचे अभिनंदन करणारा ठराव अनिल बर्डे यांनी 

मांडला. 

किनाऱ्यावरील सांडपाणी साफ करण्याची मागणी पीटर कार्दोझ यांनी केली. समुद्रकिनारी भागात, लमाणी बाया, भिकारी लोक पर्यटकांची सतावणूक करीत असतात. त्यापेक्षा पंचायतींनी सोपो पावणीत किनारा भागाचा अंतर्भाव करावा व लमाण्यांकडूनही शुल्क वसूल करावे, अशी मागणी नागरिक अनिल बर्डे व अन्य नागरिकांनी केली. यावर आवश्यक ते सोपस्कार केल्यानंतर पुढील महिन्यातील सोपो पावणी करण्यात येईल, असे गडेकर यांनी सांगितले. यावेळी पंचायत सचिव अमित प्रभू यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. पंचसदस्य इनासियो डिसोझा, दीपिका वायंगणकर, बर्नाड फर्नांडिस, गुणाजी ठाकूर, प्रतीक्षा नाईक, मनोहर केरकर, स्वीकृत सदस्य सज्जन हरमलकर तसेच गटविकास खात्याचे नर्से निरीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी टॉनी डिमेलो, लक्ष्मण ओटवणेकर, अनिल बर्डे, नरेश नाईक, रामचंद्र केरकर, दिलीप वस्त, पीटर कार्दोझ यांनी चर्चेत भाग घेतला. पंच इनासियो डिसोझा यांनी आभार मानले. 

विहिर साफसफाईच्या पैशांची मागणी

गेल्या वर्षी मधलावाडा भागातील विहिरींची साफसफाई केली. मात्र अद्याप पैसे दिले नसल्याचे नागरिक मार्सेलिन फर्नांडिस यांनी सांगितले. गेली दोन वर्षे, पैसे न मिळाल्याचे सरपंच गडेकर यांनी सांगितले.

अंतर्गत रस्त्यांबाबत पाठपुरावा : गडेकर

खालचावाडा, नारायण मंदिर रस्ता पूर्णपणे उखडलेला असून याबाबत पंचायतीसह आमदार दयानंद सोपटे यांना सुद्धा सांगितले. मात्र कोणीच दखल घेतलेली नाही, अशी तक्रार नागरिक लुईस रॉड्रिग्ज यांनी केली. पंचायतीच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्ते, वस्तवाडा, नारायण देव मंदिर, गावडेवाडा येथील रस्त्यांबाबात पाठपुरावा सुरू असल्याचे सरपंच गडेकर यांनी सांगितले. चणईवाडा येथे अरुण बांधकर ते राजन गावडे यांच्या घरापर्यंत गटार सुविधा उपलब्ध करण्याची सूचना नागरिक राघू गावडे यांनी मांडली.

=============