कचऱ्यासाठी उपाययोजना न केल्यास प्रक्रिया प्रकल्पास विरोध

मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांचा इशारा


19th February 2018, 04:05 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : वास्को व दाबोळी मतदारसंघातील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी पर्याय न शोधल्यास सडा येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प आणण्यास अटकाव करण्यात येईल, असा गर्भित इशारा मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी दिला आहे.
सडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी नाईक यांनी केली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत पालिका संचालक आर. अलका, मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक, उपनगराध्यक्ष शशिकांत परब, नगरसेवक दामोदर कासकर आदी उपस्थित होते.
गेल्या वर्षीपासून सडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याचे ढिगारे हलविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सुमारे पाच कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. तेथील बराच कचरा हलविण्यात आला आहे. तथापी मुरगाव पालिकेकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याबद्दल नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पात मुरगाव, वास्को, दाबोळी या तीन मतदारसंघांतील पंचवीस वार्डातील कचरा आणला जातो. त्यामुळे तेथे कचऱ्याचे ढिगारे पुन्हा तयार होत असल्याने सडावासियांना दुर्गंधीचा वास सहन करावा लागतो. यासंबंधी योग्य तो पर्याय शोधण्यासाठी मुरगाव पालिका अपयशी ठरल्याने भवितव्यात फक्त मुरगाव मतदारसंघातील एक ते नऊ प्रभागांतील कचरा या प्रकल्पात ओतण्याची मुभा देण्यात येईल, असा इशारा नाईक यांनी दिला.
सडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पासंबंधी आपण गेली दोन वर्षे सतत पाठपुरावा करीत आहे. यासंबंधी आपण मुख्यमंत्र्यांशी बोललो असता त्यांनी वेर्णा येथे नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू झाल्यावर तेथे कचरा नेण्यात येईल तोपर्यंत कळ काढण्याची विनंती केली होती. परंतु, वेर्णा येथील प्रकल्पासंबंधी अद्याप कोणतीही हालचाल दिसत नाही. सडा येथील प्रकल्पाच्या अवस्थेसंबंधी मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावा. मुरगाव वास्को, दाबोळी मतदार संघातील कचऱ्याची समस्या सुटण्यासाठी वेर्णा येथे नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लागण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इतर विकासकामांकडे लक्ष देताना आपण कचरा प्रकल्पाकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही, याबद्दल आपण मुरगाव मतदारसंघातील नागरिकांकडे दिलगिरी व्यक्त करतो. खरे म्हणजे कचऱ्याची समस्या दूर करण्याचे काम मुरगावचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवक यांचे आहे. तथापी सडावासियांना सोसावा लागणाऱ्या दुर्गंधीमुळे आपणास या प्रकल्पाकडे लक्ष देण्याची गरज भासली आहे. सडाच्या प्रकल्पासंबंधी मुरगाव पालिका मंडळाकडून योग्य सहकार्य मिळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

नागरिकांनी ओला व सुका कचरा एकत्र दिल्याने कचरा प्रकल्पासाठी त्याचे वर्गीकरण करावे लागत आहे. त्यामुळे काही समस्या उभ्या राहत अाहेत. कचरा वेगळा करण्यासंबंधी नागरिकांमध्ये जागृती करण्याची गरज अाहे. — आर. अलका, पालिका संचालक


सडा कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या जागी साळगाव कचरा प्रकल्पाच्या धर्तीवर प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतला तर संपूर्ण मुरगाव तालुक्यातील कचरा समस्या दूर होण्यास मदत होईल. - दीपक नाईक, नगराध्यक्ष, मुरगाव.

कोळसा हाताळणी बंद करू : नाईक
मुरगाव बंदरात कोळसा हाताळणीसंबंधी सरकारच्या ‘नार्म’ ची योग्य अंमलबजावणी होत नसल्यास कोळसा हाताळणी बंद करू, असे मुरगावचे आमदार मिलिंद नाईक यांनी स्पष्ट केले. प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी संबंधित कंपन्यांनी खबरदारी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे जेटी येथील अमोनिया टाकीमुळे होणाऱ्या त्रासासंबंधी बाहेरच्या इतर नेत्यांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही. लोकांना त्रास होत असेल तर आम्हीच ती बंद करण्यास समर्थ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील कोणीही देशात कोठेही आपला व्यवसाय सुरू करू शकतो. परंतु, आपल्या व्यवसायामुळे इतरांना त्रास होणार नाही, प्रदूषण होणार नाही यासंबंधी त्याने खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रदूषण होत असेल तर ते होऊ नये यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या ‘नार्म’ नुसार पावले उचलण्याची गरज आहे. एखाद्या सरकारच्या ‘नार्म’ च्या चौकटीत राहून व्यवसाय करीत असेल तर त्या व्यवसायाला हरकत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले.