प्राथमिक शिक्षण हाच शिक्षणाचा पाया

श्रुतिका नाईक यांचे मत : जनता विद्यालयात बक्षीस वितरण


19th February 2018, 02:02 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

म्हापसा :   पाया जर मजबूत असेल तर इमारत टिकून राहते. त्याचप्रमाणे भविष्याचा पाया असलेले प्राथमिक शिक्षण मुलांना योग्य प्रकारे मिळाल्यास त्यांचा सर्वांगीण विकास शक्य असल्याचे मत पालक - शिक्षक संघाच्या अध्यक्षा श्रुतिका नाईक यांनी व्यक्त केले.       

येथील जनता विद्यालयाच्या प्राथमिक विभागातर्फे आयोजित केलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात नाईक बोलत होत्या. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रत्नकांत च्यातिम, उपमुख्याध्यापिका राजश्री भोगटे, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा फरिदा खातून, शिक्षक व पालक संघाचे सदस्य उपस्थित होते.       

हुशार विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांनाही जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये सहभागी करुन घेताना मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. याचे सर्व श्रेय शाळा व शिक्षकांना जात असल्याचे नाईक यांनी पुढे बोलताना सांगितले.        

शैक्षणिक वर्षात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करून गौरविण्यात आले. मुख्याध्यापक रत्नकांत च्यातिम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पालक शिक्षक संघाच्या सचिव पिंकी वाडजी यांनी सूत्रसंचालन केले. खजिनदार स्मिता डिचोलकर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक कमलाकांत शेटकर यांचे सहकार्य लाभले.