तिसऱ्या टी-२०त भारतीय महिलांचा पराभव


18th February 2018, 07:52 pm
तिसऱ्या टी-२०त भारतीय महिलांचा पराभव

जोहान्सबर्ग :

मध्यगती वेगवान गोलंदाज शबनम इस्माईलाच्या (३० धावांत ५ बळी) घातक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतीय महिला संघाचा तिसऱ्या टी-२० सामननयात ५ गड्यांनी पराभव केला. ५ सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ २-१ने आघाडीवर आहे.

आतापर्यंत आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांना प्रभावीत करणारा भारतीय संघ आज १७.५ षटकांत १३३ धावा काढून तंबूत परतला. मिळालेले लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने १९व्या षटकांत ५ गडी गमावून गाठले. या विजयामुळे यजमान आफ्रिकेचे या मालिकेतील आव्हान अजून जिवंत आहे.

भारताची मजबूत फलंदाजी आजच्या सामन्यात अतिशय सुमार दिसून आली. मागच्या दोन सामन्यात अर्धशतक लगावून सामनावीर ठरलेली माजी कर्णधार मिथाली राज आजच्या सामन्यात खातेही उघडू शकली नाही व पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर मारिजेन केपचा शिकार बनली. स्मृती मंधानाने २४ चेंडूत पाच चौकार व एका षटकाराच्या जोरावर ३७ धावा तर कर्णधार हरमनप्रीत कौरने ३० चेंडूत सहा चौकार व दोन षटकार लगावत ४८ धावा केल्या.

१२व्या षटकांत दोन बाद ९३ धावांवर मजबूत असलेला भारतीय संघ एकदम कोसळला व यानंतर ४० धावांत शेवटचे आठ गडी गमावले. वेदा कृष्णमूर्तीने १४ चेंडूत २३ धावा केल्या. हे तीन गोलंदाज वगळता इतर एकही फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. इस्माईलने ३० धावोत ५ तर मसाबाता क्लासने २० धावा देत दोन गडी बाद केले.