दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडिया सज्ज

आज पहिला टी-२० सामना

17th February 2018, 09:44 Hrs

जोहान्सबर्ग :
दक्षिण आफ्रिकेवर एकदिवसीय मालिकेत ५-१ने मात केल्यानंतर आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ रविवारपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहे. विराट सेनेने दक्षिण आफ्रिकेत प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकून एक नवा इतिहास रचला आहे.
सहा सामन्यांची मालिका ५-१ने गमावल्यानंतर यजमान दक्षिण आफ्रिकेचा संघ जरी दबावात असला तरी भारतीय संघ टी-२० सामन्यांमध्ये या संघाला सहज घेणार नाही. युजवेंद्र चहल व कुलदीप यादवची जोडी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची परीक्षा घेतील.
दक्षिण आफ्रिकेत भारतासाठी टी-२० मालिका समाधानकारक झाल्या आहेत. भारताने आपला पहिला टी-२० सामना याच देशात खेळला होता व याच्या एका वर्षानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेतच महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषकही जिंकला होता. भारताने २०१७ चॅम्पियन्स चषकापासून आतापर्यंत १० टी-२० सामने खेळले असून यात सातमध्ये विजय मिळवला आहे.
या टी-२० मालिकेत सुरेश रैना, केएल राहुल व जयदेव उनादकट यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. या तिघांनीही सेंच्युरियन एकदिवसीय सामन्याआधी नेट्समध्ये दोन तास सराव केला होता. श्रीलंकाविरुद्ध शेवटच्या टी-२० मालिकेत विराट कोहली व भुवनेश्वर कुमार यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यांच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यर, महम्मद सिराज व वॉशिंगटन सुंदरला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली होती. त्या तिघांपैकी केवळ अय्यर या संघासोबत आहे. त्याला रविवारच्या सामन्यात अंतिम ११मध्ये स्थान मिळते की नाही हे पहावे लागेल.
टी-२० मालिकेसाठी संघविराट भारत:  कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, एमएस धोनी (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनादकट, शार्दुल ठाकुर. 


दक्षिण अफ्रीका: जेपी ड्यूमिनी (कर्णधार), फरहान बेहार्डियन, जूनियर डाला, एबी डिव्हिलियर्स, रीजा हेन्ड्रिक्स, क्रिस्टियन जोनेकर, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ख्रिस मॉरिस, डेन पीटरसन, आरोन फांगिसो, एंडेल फेलुकवायो, तबरेज शम्सी, जॉन-जॉन स्मिट्स.