गोवा डेेअरीच्या कारभारात घोटाळा

सत्यशोधक समितीचा आरोप; चौकशीची मागणी


15th February 2018, 03:32 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता       

फोंडा : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोवा डेअरीच्या एजीएम यांनी स्थापन केलेल्या ‘सत्यशोधक समिती’ने डेअरीच्या कारभारात घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत आणि अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणीही समितीने केली आहे. सत्यशोधक समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद सवर्डेकर यांनी बुधवारी फोंड्यात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. डॉ. सावंत यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.       

पत्रकार परिषदेला समितीचे रमेश नाईक, विकास प्रभू, वैभव परब, जयंत देसाई उपस्थित होते. गोवा  डेअरीच्या पशुखाद्य खरेदीत ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्या संदर्भातील चर्चा  वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली होती. यावेळी सात सदस्यांची सत्यशोधक समिती स्थापन करण्यात आली होती. सावर्डेकर पुढे म्हणाले, मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती. दोन दिवसांच्या चौकशीनंतर आम्हाला घोटाळ्यातील बहुतेक दस्तावेज सापडले आहेत. आम्हाला कागदपत्रे मिळाल्याची माहिती व्यावस्थापकीय संचालकांना मिळाल्यावर त्यांनी आमच्या चौकशीला हरकत घेतली. सहकार निबंधकांना या समितीबद्दल कायदेशीर बाब विचारणार असल्याचे सांगून त्यांनी कागदपत्रे देणे बंद केले.  निबंधकांना या संदर्भात कसलीच हरकत नाही, उलट त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नवसू सावंत यांची सहकार मंत्र्यांनी चौकशी केली पाहिजे. या समितीद्वारे आइस्क्रीम विभाग, दूधपुरवठा, पशु खाद्य आणि कर्मचारी भरती याविषयांची चौकशी करण्याची योजना होती.

घोटाळा नाही; चौकशीला तयार : नवसू सावंत

गोवा डेेअरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसू सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी समितीचे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, संचालक मंडळानेच या समितीच्या कायदेशीर बाबीसंदर्भात विचारणा करण्यासाठी सहकार निबंधकाना पत्र लिहिण्याचे ठरविले होते. त्यानुसार पत्र लिहिले आहे. मात्र त्याचे उत्तर आलेले नाही. माझी चौकशी करणार असल्यास त्याचे स्वागतच आहे. मी घोटाळा केलेला नाही.  त्यांना वाटत असेल की मी घोटाळा केला आहे, तर ते माझी चौकशी करू शकतात. मी काेणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.