फोंडा येथे १७ फेब्रुवारीपासून फार्मासिस्ट आंतरराष्ट्रीय परिषद

फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या राजाराम आणि ताराबाई बांदेकर कॉलेज ऑफ फार्मसी ही शैक्षणिक संस्था या परिषदेचे यजमान आहेत.

15th February 2018, 03:31 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता       

फोंडा : येथील राजीव गांधी कला मंदिरमध्ये  १७ व १८  फेब्रुवारी रोजी  दोन दिवसीय फार्मासिस्ट आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यामध्ये प्रथमच ही परिषद आयोजित केली जात आहे. फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या राजाराम आणि ताराबाई बांदेकर कॉलेज ऑफ फार्मसी ही शैक्षणिक संस्था या परिषदेचे यजमान आहेत.       

राजाराम आणि ताराबाई बांदेकर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य  आणि आयोजक सचिव डॉ. एस. एन. मामले देसाई यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. यावेळी किशोर नाईक, डॉ. शिल्पा बेळगावकर, साहाय्यक प्रा. मांगिरीश देशपांडे, डॉ. सचिन चंदवाडकर आदी उपस्थित होते. इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशनच्या या ५३  व्या वार्षिक परिषदेसाठी देशभरातून ४५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहतील. भारतीय फार्माकोपिया कमिशनच्या आणि राजाराम आणि ताराबाई बांदेकर कॉलेज ऑफ फार्मसी या शैक्षणिक संस्थेच्या सहकार्याने ही परिषद आयोजित केली जात आहे.            

या परिषदेचे उद्घाटन १७ रोजी सकाळी १० वा. होणार आहे. भारतातील औषध नियंत्रक महासंचालक डॉ. जी. एन. सिंग,  उप नियंत्रक डॉ. ए. रामकिशन आणि राज्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालक ज्योती सरदेसाई उपस्थित राहणार आहेत. आमदार रवी नाईक हे या समारंभाचे अध्यक्ष असतील. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात  वैज्ञानिक चर्चासत्रे व इतर कार्यक्रम होणार आहेत. १८ राेजी दुपारी २ वा. समारोप सोहळा  होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे  उपसंचालक राजन नाईक यावेळी मुख्य अतिथी असतील आणि फोंडा एज्युकेशन सोसायटीचे सचिव रितेश नाईक यावेळी उपस्थित राहणार आहेत.