वाढत्या रस्ता अपघातांवर नियंत्रण ठेवण्याबाबत जनजागृती कार्यक्रम

‘मार्ग’ तर्फे १० मार्चला गायन स्पर्धेचे आयोजन


15th February 2018, 03:08 am



प्रतिनिधी : गोवन वार्ता            

पणजी : राज्यातील वाढत्या रस्ता अपघातांवर नियंत्रण आणण्याकरिता युवकांमध्ये जागृती घडवून आणणे आवश्यक आहे. याच हेतूने ‘मार्ग’तर्फे दि. १० मार्च रोजी ‘गायन स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती मार्गचे संचालक गुरुनाथ केळेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तोमाझिन कार्दोज आणि अमोल नावेलकर उपस्थित होते.             

केळेकर यावेळी म्हणाले की, मार्ग मागील २५ वर्षांपासून रस्ता सुरक्षेसंबंधी जागृती करत आहेत. परंतु, रस्त्यावर होणारे युवकांचे अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्नांना यश आलेले दिसत नाहीत. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री अपघात रोखण्यापेक्षा ५० टक्के अपघात कमी करण्याची भाषा बोलतात. त्याला आमचा आक्षेप आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात अपघातच होणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राज्यासह राज्याबाहेरही अपघाती मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना भेट देऊन या अभियानाची सुरुवात करणार आहोत.       

या स्पर्धेत वाहतूक नियम आणि रस्ता अपघाताविषयी जागृती करणारे स्वत: रचलेले गीत सादर करावे लागणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमोल नावेलकर (९८२२१२६९२९) यांच्याशी व्हॉटस् अॅपद्वारे सहभाग नोंदविता येणार आहे. 

सरकारचे निश्चित धोरण 

असावे : केळेकर

राज्यातील खासगी वाहनांची संख्या वाढत आहे. याला कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपयशी ठरली आहे. त्यामुळे वाहनांची संख्या किती असावी, यासाठी सरकारने एक निश्चित धोरण तयार करणे आवश्यक आहे, असेही गुरुनाथ केळेकर 

म्हणाले. 

रस्त्यावरील स्थिती भयावह !

राज्यातील रस्ता अपघातांचे प्रमाण पाहिले असता परिस्थिती भयावह दिसते. यासाठी युवकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी ही गायन खुली गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ज्यामध्ये सहभागासाठी भाषा आणि वयाचे बंधन असणार नाही. त्याबरोबरच यावेळी सादर केली जाणारे गीते निवडून त्यांची सीडी अथवा संबंधितांना जागृती अभियानात सहभागी करून घेतले जाणार आहे. त्याबरोबरच विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत, असे तोमाझिन कार्दोज यांनी सांगितले.