पाकिस्तानला भारतावर विजय मिळविणे कठीण !

मेजर शशिकांत पित्रे यांचे प्रतिपादन : म्हापसा येथील मंथन व्याख्यानमाला


15th February 2018, 03:08 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

म्हापसा : काश्मीर हा निसर्ग संपन्न प्रदेश आहे. पर्वतांवरून खळखळ वाहणाऱ्या नद्या दृष्टीस पडतात. हा महत्त्वाचा भौगोलिक भाग आपल्या ताब्यात ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. म्हणून भारतात अस्थिरता माजवण्याचा घाट घातला जात आहे. काश्मीर ताब्यात घेऊन एक दहशतवादी राष्ट्राला जन्म देण्याचे पाकिस्तानचे कटकारस्थान आहे. परंतु भारतीय सेना सुसज्ज आणि पुरून उरेल अशी आहे. त्यांना भारतावर विजय मिळवणे कठीण आहे. त्यामुळे पाकिस्तान सरळ सरळ युद्ध करणार नाही, असे प्रतिपादन मेजर शशिकांत पित्रे यांनी मंथन व्याख्यानमालेत व्यक्त केले.                   

म्हापसा लोकमित्र मंडळ आयोजित ८ व्या मंथन व्याख्यानमालेत चीन-पाकचे भारतासमोरील धोके या विषयावर मेजर शशिकांत पित्रे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रमेश कवळेकर, नगरसेक तुषार टोपले व अभय सावंत उपस्थित होते.                  

काश्मीरचा प्रश्न पुढे करून पाकिस्तानने भारताशी तीन वेळा युद्ध केले. प्रत्येक युद्धात ते हरले आणि कारगील युद्धात सपशेल अपयश ठरले. भारताशी पारंपारिक प्रोक्सी वॉर त्यांनी सुरू ठेवले आहे. पाकिस्तानात सध्या गोंधळाचे व क्लिष्ट वातावरण आहे. कोणताही पक्ष सत्तेत आला तरी वातावरण निवळण्याची शक्यता नाही. शिया-सुन्नी वाद चिघळला आहे. सैन्य नियंत्रण ठेवण्यास असमर्थ आहे. त्यामुळे पाकिस्तान रसातळाला जात आहे, असे वक्तव्य मेजर पित्रे यांनी 

केले.                  

चीन हा भारताचा पूर्वे कडील शत्रू. त्यांची अर्थ शक्ती व सैन्य शक्तीही बलवान आहे. त्यांची सूत्रे चाणाक्ष आणि आपमतलबी राजकारण्यांकडे आहेत. जगावर त्यांनी आर्थिक संबंध जोडले आहेत. भारत आणि चीन आशिया खंडातील मोठी राष्ट्रे आहेत. परंतु त्यांचे मतभेद आहेत. ब्रिटीश काळापासून सीमा वाद सुरू आहे. काराकोरम महामार्ग दोन्ही देशांच्या सीमाभागातून जात आहे. अलीकडे पाकव्याप्त काश्मीरमधून तयार होणारा महामार्ग यास भारताचा विरोध आहे. आणि तो योग्य आहे. हा महामार्ग भारताला त्रासदायक ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय सीमा आखून दिल्यास ते उचित 

ठरेल.            

दिव्या बर्वे यांनी ईशस्तवन सादर केले. मान्यरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व्याख्यानाला सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक अविनाश बेळेकर यांनी केले. परिचय राजेंद्र जोशी यांनी तर आभार अभय सामंत यांनी मानले. शांती मंत्राने व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली.   

चीन सीमेबाबत काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक!

पूर्वोत्तर भारताचे अनेक प्रश्न चीनशी संबंधित आहेत. भारताचे आणि चीनचे मैत्रीपूर्ण संबंध राहिले तर सीमा वाद संपुष्टात येईल. २००० सालापासून भारत व चीन यामध्ये चांगला व्यापार सुरू आहे. त्यामुळे संबंध दृढ करण्याची संधी आहे. हिंदी महासागरातून जगातील जहाजांची ८० टक्के वाहतूक सुरू आहे. भारताच्या दक्षिणेला असलेला हा जलमार्ग चीन आपल्या अखत्यारीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ५० नॉटीकॉल फाईल्सपर्यंत आपली सत्ता आहे. भारत आपल्या परीने ही सत्ता शाबूत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताकडे अण्वस्त्रे आहेत. परंतु चीन आपल्यापेक्षा सज्ज आहे. त्यामुळे युद्ध करणे योग्य ठरणार नाही. दोन्ही ही सीमा भागाकडे भारताने  काळजीपूर्वक व हुशारीने लक्ष देणे आवश्यक आहे, असेड मेजर पित्रे म्हणाले.