लोक संस्कृतीतून अस्मितेची जाणीव : मृदुला सिन्हा

‘लोकरंग’ कार्यक्रम : विद्यार्थ्यांकडून लोककलांचे सादरीकरण


15th February 2018, 03:07 am

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : व्यक्तीची स्वत: विषयीची कल्पना आणि तिची जीवनदृष्टी ही नेहमी गतकाळाबाबतच्या ज्ञानामध्ये रुजलेली असते. गोव्याची लोक संस्कृतीही प्रत्येक व्यक्तीला तिची ओळख आणि अस्मितेची भावना यांची जाणीव करून देते. गोव्याची संस्कृती सर्वसमावेशक असून तिचे जतन करण्याचे धैर्य आता युवा पिढीने आपल्या खांद्यावर पेलायला हवे, असे प्रतिपादन राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी केले.              

गोवा विद्यापीठाच्या कोकणी विभाग आणि बा. भ. बोरकर अध्यासन अतिथी संशोधन प्रोफेसर उपक्रमांतर्गत गोवा विद्यापीठातील जुबिली खुल्या सभागृहात ‘लोकरंग’ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर गोवा विद्यापीठाचे कुलगुरू  प्रा. वरुण साहनी, कुलसचिव वाय. व्ही. रेड्डी, अतिथी संशोधन प्रोफेसर उपक्रमाचे संयोजक प्रा. रामराव वाघ, उपक्रमाच्या सीईओ अनुराधा वागळे, कोकणी विभाग प्रमुख व लोकरंगचे निमंत्रक डॉ. प्रकाश पर्येकर उपस्थित होते.   या वेळी आपल्या अनोख्या शैलीत राज्यपालांनी लोकगीत गाऊन दाखविले.            

गोव्यातील लोकसंस्कृतीची युवकांमध्ये जागृती व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे डॉ. पर्येकर यांनी सांगितले. अशाच पद्धतीचा कार्यक्रम २००८ मध्ये करण्यात आला होता. पण यंदाचा हा कार्यक्रम मोठ्या स्वरूपाचा असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी हा उपक्रम आयोजित करण्याची तयारी असल्याचे ते म्हणाले.             

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात चंद्रावळ आणि इतर पारंपारिक गीते गाऊन तसेच श्री षष्टी शांतादुर्गा गोळीबाब समाज मंडळ धाकटे भाट डोंगरी यांनी सादर केलेल्या सुवारी वादनाने करण्यात आली. तसेच फादर आग्नेल माहविद्यालयातर्फे  मुसळ नृत्य सादर करण्यात आले.             यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक लोककलांचे सादरीकरण केले.

  एमईएस महाविद्यालयातर्फे तालगडी, निराकार विद्यालयातर्फे पेरणी जागर,  सरकारी महाविद्यालय खांडोळातर्फे चपई नृत्य,  कोकणी विभाग गोवा विद्यापीठातर्फे मांडो, फुगडी,  सत्तरी येथील श्री निरंकारी कला मंचातर्फे रणमाले नृत्य सादर करण्यात आले. तसेच लोकवेद संकलन, संवर्धन आणि संशोधनाची गरज या विषयावर परिचर्चा झाली.  गोवा विद्यापीठातर्फे जुगलबंदीसुध्दा यावेळी सादर करण्यात आली.             

यावेळी केरी सत्तरी येथील आमचे दायज संस्थेतर्फे पारंपारिक  वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यावेळी प्रदर्शनाचे संयोजक गोपीनाथ गावस यांनी ऐतिहासिक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.