कोलवाळात कैद्यांना भांगेची झिंग


15th February 2018, 03:06 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

म्हापसा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याने मंगळवारी सायंकाळी आपल्या कोठडीतील इतर कैदी, तुरूंग रक्षक आणि जेलरांना भांग मिसळलेले दूध प्यायला दिल्याने ३० कैद्यांसह १० तुरूंग रक्षकांची प्रकृती बिघडली. त्यातील दोन कैदी आणि एक तुरूंग रक्षक बेशुद्धावस्थेत सापडल्याने त्यांना उपचारासाठी बांबोळी आणि म्हापसा येथील इस्पितळात दाखल करण्यात आले.

कुख्यात गुंड अश्पाक बेंग्रेच्या खुनाच्या प्रकारानंतर कैदी व तुरूंग रक्षकांना भांग पाजण्याचा प्रकार समोर आल्याने कोलवाळ कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, तुरूंग अधीक्षक एन. व्ही प्रभुदेसाई यांनी यासंदर्भात म्हापसा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भांग देणाऱ्या अनिल भुई या कैद्याविरुद्ध भारतीय दंड (पान ४ वर)

संहितेच्या कलम ३२८ खाली गुन्हा नोंद केला आहे.  याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील सेल क्रमांक तीनमधील अनिल भुई या कैद्याने महाशिवरात्री उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास दुधात भांग हा नशा आणणारा पदार्थ मिसळला व सेलमधील ३० कैदी तसेच तुरूंग रक्षकांना ते दूध पिण्यासाठी दिले. दूध पिल्यानंतर सर्वांनाच त्याची नशा चढली व त्यांना उलट्या सुरू झाल्या. कैद्यांपैकी सुर्वेश ऊर्फ बाबू आरोलकर (३१), विनय गडेकर (२५) व तुरूंग रक्षक किरण नाईक हे तिघेजण रात्री १२ च्या सुमारास कारागृहात बेशुद्धावस्थेत आढळून आले. हा प्रकार कारागृह अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी बेशुद्ध असलेल्या तिघांना म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. जिल्हा इस्पितळातून कैदी सुर्वेश आरोलकर व विनय गडेकर यांना पुढील उपचारासाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आले. त्यातील विनय गडेकर याला बुधवारी दुपारी डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले. सुर्वेश आरोलकरवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत, तर तुरूंग रक्षक किरण नाईक यांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले.

तुरूंगाधिकाऱ्यांनी कारागृहातून बादलीभर दूध हस्तगत केले आहे. मात्र त्यात भांग मिसळलेले आहे की नाही, याची छाननी करण्यासाठी ते अन्न व औषध प्राधिकरण किंवा वैद्यकीय इस्पितळाच्या स्वाधीन करण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे.  दरम्यान, या प्रकारावरून कारागृहात अंदाधुंदीचे प्रकार घडत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर २०१७ मध्ये कारागृहाच्या अधीक्षकपदी नेमणूक झालेल्या एन. व्ही. प्रभुदेसाई यांनी अद्याप एकदाही कारागृहातील अंदाधुंदीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी छापा टाकलेला नाही. ते कारागृहात काही वेळच सेवा बजावत असल्याने कैदी तसेच कारागृह कर्मचाऱ्यांवर त्यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे अशा प्रकारांना उत्तेजन मिळत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक कृष्णा गावस करीत आहेत. 

बेशुद्ध झालेले कैदी हल्ला प्रकरणातील आरोपी

कारागृह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भांग मिसळलेल्या दुधाचा परिणाम झालेले दोन्ही कैदी मयडे येथे गेल्या डिसेंबरमध्ये घडलेल्या प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपी आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सहाही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडीच्या आदेशानुसार याच कारागृहात ठेवण्यात आले आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त सेलमधील कैद्यांना भांग पाजून मौजमजा करण्याचा त्यांचा बेत होता आणि त्यानुसारच त्यांनी बाहेरून भांग आणली असल्याचा संशय कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.      

सुरक्षा असतानाही कारागृहात भांग आली कोठून ?

कारागृहात प्रवेश करणाऱ्यांच्या तपासणीसाठी दोन्ही गेटवर कडक पोलिस पहारा असतो. गेटमधून कारागृहात येणाऱ्यांची पोलिस व राखीव दलाच्या जवानांकडून तपासणीही केली जाते. तरीही कैदी व कर्मचाऱ्यांना पाजण्यात आलेली भांग कारागृहात आली कोठून, असा प्रश्न वरिष्ठ तुरूंग अधिकाऱ्यांना पडला आहे.