राज्यात अपघाताच्या टक्केवारीत घट

२०१७ मध्ये ३२८ जणांना मृत्यू : फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत सर्वाधिक मृत्यू

15th February 2018, 03:47 Hrs

प्रतिनिधी । गोवन वार्ता                                                

पणजी : राज्यात अपघाती मृत्यू टाळण्यासाठी तसेच वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी पोलिस वाहतूक विभागाने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे राज्यात २०१६ या वर्षीच्या तुलनेत २०१७ साली अपघातात ८.९९ टक्के घट झाली. तसेच अपघाती मृत्यूंमध्ये २.३८ टक्के घट झाली आहे.                   

अपघाती मृत्यू टाळण्यासाठी विविध उपक्रम राबविले असतानाही राज्यात ९५.०७ टक्के अपघात दुचाकी चालकांच्या बेफिकीर आणि निष्काळजीपणामुळे झाले आहेत. तसेच राज्यात एकूण ३२८ जण अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. यात ७०.७३ टक्के म्हणजे २३२ अपघाती मृत्यू केवळ दुचाकी चालकांचे झाले आहेत, हे वाहतूक पोलिस विभागाच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले. राज्यात २०१६ मध्ये ४,३०४ अपघातात ३३६ जणांचा मृत्यू झाला तर २०१७ मध्ये ३,९१७ अपघातात ३२८ जणांचा मृत्यू  झाला आहे.                              

राज्यात वाहतूक पोलिस विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१७ साली फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत सर्वाधिक ३३५ अपघात तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत २०१६ साली ४२७ अपघात आणि ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. आकडेवारीनुसार  २०१७ साली फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत अपघात तसेच मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. यावेळी ९२ अपघात आणि २ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.                  

 उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा मिळून राज्याची २६ पोलिस स्थानकात विभागणी केली आहे. यात दक्षिण गोव्यात १४ तर उत्तर गोव्यात ११ आणि एक कोकण रेल्वे पोलिस स्थानक मिळून २६ पोलिस स्थानके कार्यरत आहेत. आकडेवारीनुसार २०१७ साली फोंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत सर्वाधिक ३४ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्या खालोखाल म्हापसा २९, पेडणे २५, मायणा कुडतरी २५ डिचोली पोलिस स्थानकाच्या हद्दीत २१ जणांचा मृत्यू झाला आहे.       वाहतूक पोलिस विभागाच्या आकडेवारीनुसार वेर्णा पोलिस स्थानकाच्या हद्दीत २०१६ या वर्षाच्या तुलनेत २०१७ साली मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. यात २०१६ साली ३६ जणांचा तर २०१७ साली १६ जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त अपघातातही घट झाली आहे. २०१६ साली ३९८ अपघात तर २०१७ साली ३२४ अपघात झाले आहेत.