म्हापशात कार्निव्हल उत्साहात


14th February 2018, 03:12 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

म्हापसा : ‘खा, प्या, मजा करा’ असा संदेश देत किंग मोमोने म्हापसा कार्निव्हल मिरवणुकीला प्रारंभ केला. मिरवणुकीत गोमंतकीय नागरिकांचे जीवन, पर्यावरण, जंक कार अशा अनेक चित्ररथांद्वारे देणाऱ्या संदेशांनी नागरिकांचे लक्ष वेधले. म्हापसा व परिसरातील हजारो नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा राहून कार्निव्हलचा आनंद लुटला.            

येथील तार पुलाजवळ कार्निव्हल चित्ररथ मिरवणुकीचा शुभारंभ नगर विकासमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी फलक दाखवून केला. जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माणमंत्री जयेश साळगांवकर, आमदार ग्लेन टिकलो, कार्निव्हल समितीचे अध्यक्ष नगराध्यक्ष रोहन कवळेकर, नगरसेवक, सरकारी अधिकारी व इतर उपस्थित होते.            

मिलाग्रीस चर्च, कोमुनिदाद घर, म्हापसा अर्बन बँक मार्केट, टॅक्सी स्थानक, गांधी चौकातून कार्यक्रमस्थळी जाऊन मिरवणुकीची सांगता झाली. स्पर्धेत पारंपरिक गटात ८, विदूषक गटात १७, संस्था व क्लब गटात ९, जंक कार गटात ९, कौटुंबिक गटात ८ मिळून ५१ चित्ररथ सहभागी झाले होते. अनेक चित्ररथांनी पर्यावरण जतनाचा संदेश देणारे चित्ररथ तयार केले होते.            

चित्ररथ मिरवणुकीनंतर बक्षीस वितरण व गीत गायनाच्या कार्यक्रमाने चार दिवसीय कार्निव्हल महोत्सवाची सांगता झाली.