फर्मागुढी येथे १९ रोजी ​व्याख्यान

14th February 2018, 03:36 Hrs

पणजी : गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या आणि बांदोडा ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय शिवजयंती उत्सवास पुणे येथील इतिहास अभ्यासक तथा इतिहासाचे गाढे अभ्यासक डाॅ. लहू गायकवाड यांचे शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.            

फर्मागुढी फोंडा येथील श्री गणपती मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गायकवाड व्याख्यान देणार असून सकाळी ९ वा. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रामकृष्ण ढवळीकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, आमदार रवी नाईक व सुभाष शिरोडकर, जिल्हा पंचायत सदस्य चित्रा फडते, बांदोडेचे सरपंच रामचंद्र नाईक व माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सचिव सुधीर महाजन उपस्थित राहणार आहेत.            

लहू गायकवाड यांनी पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इतिहास विषयात जुन्नरचा इतिहास (प्राचीन व अर्वाचीन) विषयात पीएचडी केलेली आहे. मागील २० वर्षांपासून ते कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पहात आहेत.       

लहू गायकवाड यांच्या व्याख्यानानंतर माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे राज्यस्तरीय संवादासहित अभिनय स्पर्धा (दोन गटात) व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी ९४२२४४४६२४ या क्रमांकावर व्हाॅटस्अॅपद्वारे नावे पाठविण्याची विनंती माहिती खात्याचे माहिती सहाय्यक श्याम गावकर यांच्यातर्फे करण्यात आली आहे.