गोमेकॉ बनणार अग्रगण्य वैद्यकीय हब

३८६ कोटींच्या सुपर स्पेशालिटी विभागाची पायाभरणी

14th February 2018, 11:59 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी :  सुपर स्पेशालिटी विभागामुळे गोवा वैद्यकीय महविद्यालय (गोमेकॉ) देशातील एक अग्रगण्य वैद्यकीय हब बनणार आहे. ३८६ कोटी रुपयांचा खर्च करून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात ११ सुपर स्पेशालिटी सुविधांचा समावेश असेल. या प्रकल्पामुळे गोमेकॉ इस्पितळात सर्वच रोगांवर उच्च दर्जाचे उपचार होतील. त्यामुळे गोमेकॉ हे आघाडीचे इस्पितळ म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला.       

 पंतप्रधान स्वास्थ्य सुरक्षा योजनेंतर्गत बांबोळीत उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी विभागाची पायाभरणी मंगळवारी  कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात प्रतीकात्मक स्वरूपात करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, खासदार विनय तेंडुलकर, खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, आमदार फ्रान्सिस्को सिल्वेरा,  आमदार टोनी फर्नांडिस, ज्ञानेश पांडे, गोमेकॉचे डीन डॉ. प्रदीप नाईक, गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद बांदेकर, सरपंच मारियाना आरावजो उपस्थित होते.       

यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हा प्रकल्प दीड वर्षांपूर्वीच मंजूर झाला होता. केंद्र सरकारकडून निधीची व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, काही अडचणींमुळे हा प्रकल्प प्रलंबित होता. आता या अडचणी दूर होऊन या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.       

सुपर स्पेशालिटी विभाग हा राज्यातील मोठा वैद्यकीय प्रकल्प आहे. त्यामध्ये सर्व सुविधा उपलब्ध असतील. खासगी क्षेत्रातील सुविधांपेक्षा या विभागात उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. अंदाजे ५०० पेक्षा अधिक खाटांच्या या प्रकल्पात ११ सुपर स्पेशालिटी विभाग उभारण्यात येतील, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले. या कार्यक्रमासाठी उपस्थित सांत आंद्रेचे आमदार टोनी फर्नांडिस यांनी मधुमेहाचे प्रमाण राज्यात वाढत असल्याने या विभागांत मधुमेहावरील उपचारांची सोय व्हावी, अशी मागणी केली. सांत आंद्रेचे आमदार फ्रान्सिस्को सिल्वेरा यांनी गोमेकॉमध्ये केवळ सत्तरी तालुक्यातील कर्मचाऱ्यांची भरती होते. या प्रकल्पामुळे तिसवाडी तालुक्यातील बेरोजगारांनाही संधी मिळावी, अशी सूचना केली. खासदार नरेंद्र सावईकर आणि विनय तेंडुलकर यांनी केंद्र सरकारकडून राज्याला विविध विकासकामांसाठी मिळणारे सहकार्य आणि त्यामुळे विविध प्रकल्पांची पूर्तता यावर भर देऊन राज्यात विकासाची ही गती अशीच सुरू राहणार असल्याचे सांगितले.

कर्करोग विभाग उभारणीसाठी ४४ कोटी मंजूर

सुपर स्पेशालिटी प्रकल्पात न्युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, कार्डिओलॉजी आदी सुविधा उपलब्ध असतील. यामुळे गोमंतकीयांना एकाच ठिकाणी सर्व उपचारांची सोय होईल. सर्व आरोग्य सेवा गोव्यात उपलब्ध होणार असल्याने रुग्णांचा त्रास आणि खर्च वाचेल. या संकुलात कर्करोग विभाग उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून ४४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असेही मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले.