ग्रेटर पणजीतून दहाही गावांना वगळा

सांताक्रुझ ग्राम विकास समितीची मागणी : व्हिक्टोरिया फर्नांडिससह ग्रामस्थांची उपस्थिती


14th February 2018, 03:39 am
ग्रेटर पणजीतून दहाही गावांना वगळा

प्रतिनिधी | गोवन वार्ता                     

पणजी : केंद्राकडे आपण राज्याला विशेष दर्जा देण्याची मागणी करतो. कारण आमची जमीन पुढील पिढ्यांना हवी आहे. मग गावांना विशेष दर्जा नको का? ग्रेटर पणजी पीडीएमध्ये सहभागी दहाही गावांना वगळावे आणि त्यावर येत्या अधिवेशनात चर्चा करावी, अशी मागणी सांताक्रुझ ग्रामस्थ आणि सांताक्रुझ ग्राम विकास समितीने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. यावेळी माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस, एल्सा फर्नांडिस, आर्तुरो डिसोझा, अॅड. अँथनी लॉरेन्सो, रुदार फर्नांडिस, पॉल फर्नांडिस आणि सिद्धेश कलंगुटकर उपस्थित होते.

एल्सा फर्नांडिस म्हणाल्या की, सांताक्रुझ आमदारांनी पीडीए नको म्हणून सांगितले होते. ११ आमदार आणि ४ बिल्डरांचा समावेश असलेल्या या पीडीएत एकाही पर्यावरण अभ्यासकाचा समावेश का करण्यात आला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सांताक्रुझ संदर्भात दहा वर्षांपूर्वीही असाच प्रयत्न झाला होता. आता आमदार, पंचायत सदस्यांनी पाठिंबा दिला. मात्र, या संदर्भात कोणालाही विचारात घेतलेले नाही. पीडीएच्या माध्यमातून सर्वशेती माती खाली घालण्यात येणार आहे. डोंगरावरील विकास कोणाला हवा आहे ? शिवाय सांताक्रुझ बरोबर परिसरातील मेरशी, चिंबल यांनाही भविष्यात त्रास सहन करावा लागणार आहे.

नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांना बोंडवळ तलाव परिसर ‘नो डेव्हलपमेंट झोन’मध्ये येतो, हे माहीत असूनही त्यांनी या माध्यमातून कायद्याचे उलंघन केलेले आहे. त्याबरोबरच पीडीएच्या माध्यमातून राजकारणी आणि बिल्डर लॉबी येथे प्रवेश करू इच्छित अाहे, असा आरोपही एल्सा फर्नांडिस यांनी यावेळी केला.    

प्रसंगी रस्त्यावर उतरणार : व्हिक्टोरिया फर्नांडिस

जनमत कौलासाठी संघर्ष केल्यामुळेच गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. जॅक सिक्वेरा हे सांताक्रुझचे आमदार होते. पीडीएच्या माध्यमातून सरकार येथील जमीन बिल्डरांना विकण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच अर्थ मागील दाराने गोवा विकण्याचा प्रयत्न आहे. गोवा वाचविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजपर्यंत सांताक्रुझच्या जनतेला सांभाळले. अंतिम श्वासापर्यंत सांभाळणार असून प्रसंगी रस्त्यावरही उतरणार, असे माजी आमदार व्हिक्टोरिया फर्नांडिस यांनी सांगितले.

रविवारी निदर्शने

ग्रेटर पणजी पीडीएला विरोध कण्यासाठी सांताक्रुझ बरोबरच कालापूर आणि कुजिरामधील समाविष्ट गावे रविवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कालापूर येथील चर्चजवळ निदर्शने करणार आहेत.