वाहतूक नियमांबाबत मानसिकता बदलणे गरजेचे !

‘गोवन वार्ता-लाप’मध्ये वाहतूक संचालकांचे आवाहन

13th February 2018, 03:30 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : वाहतूक पोलिस समोर दिसत असतील तर त्यांच्या समोरून जातानाच फक्त वाहतूक नियम पाळण्याची असलेली मानसिकता लोकांनी बदलण्याची गरज आहे. वाहतूक नियम हे सर्वांची सुरक्षितता विचारात घेऊन तयार केलेले अाहेत. त्याच्या अंमलबजावणीमुळे अपघाताचे प्रमाण कमी करून जीवित आणि वित्त हानी टाळणे शक्य आहे. लोकांनी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वाहतूक संचालक निखिल देसाई यांनी केले.

दै. ‘गोवन वार्ता’ आणि ‘द गोवन एव्हरिडे’ यांनी आयोजित केलेल्या ‘गोवन वार्ता-लाप’ कार्यक्रमात ते संवाद साधत होते. कार्यक्रमात दै. ‘गोवन वार्ता’चे संपादक संजय ढवळीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. विशेष प्रतिनिधी पांडुरंग गावकर यांनी त्यांची ओळख करून दिली. देसाई पुढे म्हणाले, जसजसे रस्ते रुंद होत आहेत आणि महागड्या वेगवान गाड्या रस्त्यांवर येत आहेत, तसे अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. काही ठिकाणी वाहतूक पोलिस नसल्याचा गैरफायदा घेऊन नियमांचे सर्रास उल्लंघन केले जाते. अशी ठिकाणे वाहतूक पोलिसांच्या मदतीने निश्चित करण्यात आली असून लवकरच अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा विचार आहे. वाहतूक पोलिसांच्या शर्टवर छोटा कॅमेरा लावण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे वाहतूक उल्लंघन करणाऱ्यांचे पोलिसांशी कसे वर्तन होते, हेही स्पष्ट होईल.                                     

कर्मचाऱ्यांवरील कागदपत्रांचा बोजा कमी करून कामाला गती देण्यासाठी वाहतूक विभागात आॅनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वाहतूक परवाना, वाहन चालक परवाना हवा आहे, त्यांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येतो. त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्हींमध्येही बचत होते. परिणामी खात्यातील कर्मचाऱ्यांना अन्य काम करणे सोपे जाते, असे देसाई यांनी सांगितले.

सरकारी सुविधांसाठी लोकांकडून रोख रकमेऐवजी ई-पैसा स्वीकारण्याचे म्हणजेच कॅशलेस बनण्याचे सरकारचे धोरण आहे. वाहतूक विभागानेही अशी सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. सध्या खात्यातर्फे १९ सुविधा प्रायोगिक तत्त्वावर आॅनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. आठवडाभारात चाचणी करून अधिकाधिक सेवा ऑनलाईन केल्या जातील. याचा लाभ घेण्यास लोकांनी सुरुवातही केली आहे. 

—निखिल देसाई, संचालक, वाहतूक विभाग

शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण

वाहतूक परवाना असलेल्या अनेक लोकांना वाहतूक नियमांची माहिती नसते. अशी माहिती लहान वयातच देण्यासाठी शाळा, महाविद्यालये आणि अन्य प्रकारची आस्थापने यांना भेटून त्यांना माहिती दिली जात आहे. या संदर्भातील प्रशिक्षणही शालेय विद्यार्थ्यांना दिले जात आहे. यामुळे भविष्यात चांगले चालक आणि जबाबदार नागरिक तयार होतील. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ आयोजित केला जातो, असेही देसाई म्हणाले.  

Related news

‘फोमेंतो मीडिया’तर्फे हुतात्मा जवानांना श्रद्धांजली

मिरामार येथे दहशतवादी हल्ल्याचा निषेध; पाकला अद्दल घडविण्याची मागणी Read more

विष्णू वाघ यांच्यावर आज फोंड्यात अंत्यसंस्कार

बांदोडकर मैदानावर अंत्यदर्शन; मंत्री गोविंद गावडे यांची माहिती Read more