खाणप्रश्न हाताळताना पर्रीकरांकडून चुका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांचा आरोप; सर्वपक्षीय बैठकीची मागणी


13th February 2018, 03:16 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : मुख्यमंत्री तथा खाणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी खाणप्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे राज्यातील खाण उद्योगासमोरील अडचणी वाढत गेल्या. त्याचा आर्थिक फटका तमाम गोमंतकीयांना बसला. शिवाय राज्याचे सुमारे ५० हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

नाईक म्हणाले, १० सप्टेंबर २०१२ रोजी तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढलेला आदेश म्हणजे गोव्यातील खाण उद्योग बंद करण्यासंदर्भातील पहिले पाऊल होते. त्यामुळेच पुढील गुंतागुंत निर्माण झाली. तेव्हापासून राज्यातील ट्रक मालक आणि या उद्योगावर अवलंबून असलेले छोटे-मोठे व्यापारी, बार्ज मालक आणि लाखो कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे. खाण परवाना मंजुरी आणि त्यांचे नूतनीकरण याविषयी योग्य माहिती देण्याऐवजी भाजप सरकारने त्याविषयी संभ्रम निर्माण केला, असे ते म्हणाले. 

सरकारने राज्यातील आयर्न ओव्हरचा लिलाव करू नये. त्यामुळे राज्याबाहेरील लोक येऊन येथील खनिज संपत्तीची लूट करतील. सद्यस्थितीत राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावून हा प्रश्न कशाप्रकारे निकाली निघेल, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वीच पर्यटकांविषयी केलेल्या वक्तव्यावर बोलताना, एखाद्याने गैरकृत्य केले म्हणून सर्वांनाच दोषी ठरवू नये, असे ते म्हणाले.

एकत्रित निवडणुकांसाठी काँग्रेस तयार

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्यासंदर्भातील चर्चेबाबत बोलताना शांताराम नाईक यांनी, काँग्रेस कधीही निवडणुकांना सामोरे जाण्यास तयार आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी घटक विधानसभा बरखास्त करतील का, असा सवाल केला. एकत्रित निवडणुकांसाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ते शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.