कोसंबी विचार महोत्सव १३ पासून


10th February 2018, 07:14 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : राष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त केलेला, जागतिक कीर्तीच्या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना ऐकण्याची व त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी देणारा डी. डी. कोसंबी विचार महोत्सव १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती कला आणि संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

   यावेळी उपसंचालक अशोक परब आणि कृष्णदास श्यामा ग्रंथालयाचे क्युरेटर डॉ. कार्लुस फर्नांडिस उपस्थित होते. मंगळवार, १३ रोजी संध्याकाळी ५ वाजता महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन होईल. त्यानंतर पहिले व्याख्यान ज्येष्ठ नाट्यलेखक- दिग्दर्शक मकरंद साठे यांचे होणार आहे. ते ‘जागतिकीकरणाच्या काळात राष्ट्रीयता, संस्कृती आणि रंगभूमी’ या विषयावर विचार 

मांडतील. 

   १४ रोजी द स्टोरी आॅफ फाऊंडेशनच्या संचालक जया रामचंदानी ‘२१ व्या शतकात शिक्षणातला विरोधाभास’ या विषयावर विचार मांडतील. १५ रोजी ब्रिटीश- भारतीय उद्योजक लॉर्ड करण बिलीमोरिया ‘ब्रेक्झिटच्या संदर्भातून भारत, ब्रिटन आणि युरोपियन युनियन, युनियनच्या भवितव्यावर पारसी दृष्टीक्षेप’ यावर भाष्य करणार आहेत. १६ रोजी भारतीय समकालीन चित्रकार आणि क्ष किरणत​ज्ज्ञ सुधीर पटवर्धन ‘आजची कला काय आहे’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.  

महोत्सव का महत्त्वाचा?    

  दामोदर धर्मानंद कोसंबी यांचा जन्न कुसबण (केपे) येथे झाला. त्यांनी संख्याशास्त्र, नाणकशास्त्र, गणित, प्राच्यविद्या आणि अनुवंशशास्त्र यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात मुलभूत संशोधन केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या या महान गोमंतकी व्यक्तिमत्त्वाची ओळख युवा पिढीला व्हावी या उद्देशाने २००८ पासून दामोदर धर्मानंद तथा डी. डी. कोसंबी विचार महोत्सवास सुरुवात करण्यात आली.    

ओळख मान्यवरांची

मकरंद साठे      

मकरंद साठे मागील २५ वर्षांपासून कादंबरी, नाट्य आणि अन्य गंभीर विषयावरील लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेली ‘चारशे कोटी विसरभोळे’ ‘रोमन साम्राज्याची पडझड’, ‘थोंब्या’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘सापत्नेकराचे मूळ’ चौक’, ‘ते पुढे गेले’, ‘आषाढ बार’ आदी नाटके प्रसिद्ध आहेत.      

जया रामचंदानी      

द स्टोरी आॅफ फाऊंडेशनच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, कला आणि संस्कृतीविषयी शिक्षण देणाऱ्या जया रामचंदानी विज्ञान शिक्षक, उद्योजक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या लवकरच भौतिकशास्त्र शिकविण्यासाठी जपानला जाणार आहेत.      

लॉर्ड करण बिलीमोरिया      

करण बिलीमोरीया हे भारतातील कोब्रा बीअरचे चेअरमन आहेत. ज्याची मोल्सन कूर्सशी भागीदारी आहे. त्यांनी युके इंडिया बिझनेस कौन्सिलची स्थापना केली आहे. ते थेम्स व्हॅली विद्यापीठाचे माजी कुलगुरु आहेत. २००८ मध्ये त्यांना प्रवाशी भारतीय सन्मानाने भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.      

सुधीर पटवर्धन      

सुधीर पटवर्धन हे चित्रकार आहेत. ते मागील ४० वर्षांपासून सातत्याने देश आणि देशाबाहेर चित्रप्रदर्शन आयोजित करत आहेत. त्यांच्या चित्रकलेच्या कामावर आधारित ‘द कम्लिसीट ऑब्जर्व्हर’  हे पुस्तक रणजित होस्कोटे यांनी २००४ मध्ये प्रकाशित केले आहे.