आरोप खोटे, पण चौकशीला सहकार्य : कवळेकर

एसीबीकडून तीन तास चौकशी


10th February 2018, 07:13 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी विरोधी पक्षनेते तथा केपेचे आमदार बाबू कवळेकर याची दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसीबी) शुक्रवारी दुपारी तीन तास चौकशी केली. चौकशीनंतर बोलताना कवळेकर यांनी चौकशीला सहकार्य करत आहे. मात्र, आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे 

सांगितले.      

या प्रकरणी एसीबीने समन्स जारी करून बाबू कवळेकर यांना पहिल्यांदा सोमवार, ५ फेब्रुवारीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. त्यावेळी कवळेकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कारण पुढे करून २१ मार्चपर्यंतचा अवधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर एसीबीने दुसऱ्यांदा समन्स जारी करून शुक्रवारी हजर राहण्यास सांगितले होते.                   

त्यानंतर एसीबीने नोटीस दिल्याने कवळेकर यांनी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जाची दखल घेऊन सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी एसीबीसमोर म्हणणे सादर करण्यास सोमवार १२ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. तोपर्यंत कवळेकर यांना अटक न करण्याचा आदेश देऊन त्यांना दिलासा दिला. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर कवळेकर शुक्रवारी दुपारी १२ वाजता एसीबी पथकासमोर हजर राहिले. यावेळी कवळेकर यांची सुमारे तीन तास चौकशी करण्यात आली. दुपारी तीन वाजता कवळेकर एसीबी कार्यालयातून बाहेर पडले.      

यावेळी कवळेकर यांनी आपली बाजू पत्रकारांसमोर मांडली. मागील ६ वर्षे या प्रकरणाची  चौकशी सुरू आहे. या कालावधीत सुमारे २० वेळा चौकशीसाठी हजर राहिलो. प्रत्येकवेळी चौकशीसाठी सहकार्य केले आहे. आणि यापुढेही सहकार्य करणार असल्याची माहिती बाबू कवळेकर यांनी दिली.      

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पथकाने बाबू कवळेकर याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (२), १३ (१) ड आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ खाली १५ सप्टेंबर २०१७ रोजी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पथकाने त्यांच्यासह त्यांची पत्नी सावित्री कवळेकर यांनाही या प्रकरणात सहआरोपी केले आहे.