एसआयटीतर्फे नाईक यांना पुन्हा समन्स

बेकायदा खाण प्रकरण : रॉयनी मागितला वेळ


10th February 2018, 08:13 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता

पणजी : फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र राॅय नाईक यांना बेकायदा खाण प्रकरणी शुक्रवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण पुढे करत रॉय यांनी गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाकडे (खाण, एसआयटी)  पाच दिवसांचा वेळ मागितला आहे. याप्रकरणी विभागाने नव्याने समन्स जारी करत बुधवार, १४ फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 

राॅय नाईक यांच्यातर्फे अॅड. सतीश पिळगावकर विशेष तपास पथकाकडे उपस्थित राहिले. नाईक यांना याअाधी ६ रोजी समन्स पाठवून शुक्रवारी सकाळी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. 

बेकायदा खाण प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शहाच्या अहवालानुसार खाण संचालक प्रसन्न आचार्य यांनी एसआयटीकडे तक्रार दाखल केली आहे.  या तक्रारीनुसार एसआयटीने माजी खाण संचालक अरविंद लोलयेकर, माजी खाण अधिकारी राॅबर्ट गोन्साल्वीस, शोभना रिवणकर, डी. के. भावे, बबन गावकर तसेच निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शहाच्या अहवालात असलेल्या संशयितांविरोधात भा. दं. सं. कलम ४०९, २१२, २०१, २१८, ४२०, ३७९, १२० बी, १६६, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, खाण आणि खनिजे विकास कायदा, खनिज संरक्षण व विकास नियम आणि गोवा प्रतिबंधक आणि बेकायदेशीर खाण परिवहन, स्टोरेज ऑफ मिनरल्स नियम २००४ नुसार २०१३ साली गुन्हा दाखल केला आहे.

या गुन्ह्याच्या चौकशीवेळी नाईक यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केल्याची माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली आहे.