साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत


10th February 2018, 06:07 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : रवींद्र भवन साखळी, कोकणी सेवा केंद्र साखळी, आल्त संस्था व सम्राट क्लब साखळी आणि गोवा कला व संस्कृती खात्याच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ११ रोजी पाचवी अखिल गोवा कोकणी भजन स्पर्धा अायोजित करण्यात अाली अाहे. भजन सम्राट स्व. पं. वामनराव पिळगावकर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ९ वा. होणार आहे, अशी माहिती सभापती तथा या संगीत समारोहाचे स्वागताध्यक्ष डाॅ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
या पत्रकार परिषदेला या स्पर्धेचे अायोजन निमंत्रक डाॅ. पूर्णानंद च्यारी, रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष विठोबा घाडी, कोकणी सेवा केंद्र साखळीचे अनिल वेर्णेकर, रघुदास तारी, अाल्त साखळीच्या सिद्धी प्रभू, कार्याध्यक्ष राजन शेटये, सम्राट क्लबच्या अनुराधा नायक आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सभापती डाॅ. प्रमोद सावंत, कला व संस्कृती खात्याचे संचालक ज्येष्ठ कलाकार शिवानंद खेडेकर आदींची उपस्थिती लाभणार अाहे. तर समारोप समारंभास माजी अामदार दामू नाईक यांची उपस्थित राहणार अाहेत. ही स्पर्धा पुरुष व महिला गटात होणार असून पुरुष गटात दहा व महिला गटात दहा पथकांना अामंत्रित करण्यात अालेले अाहे. स्पर्धा पं. वामनराव पिळगावकर यांच्याबरोबरच स्व. पं. मनोहरबुवा शिरगावकर यांच्या स्मरणार्थ होणार अाहे. पुरुष गटाच्या व्यासपीठाला स्व. लीलाधर नावेलकर, तर महिला गटाच्या व्यासपीठाला स्व. लक्ष्मण सुभा (चेपू) सावंत यांचे नाव देण्यात अालेले अाहे. या सोहळ्याला अामोणे येथील प्रसिध्द भजनी कलाकार नारायण गोपी गोवेकर यांचा सत्कार केला जाणार अाहे, अशी माहिती स्पर्धेचे निमंत्रक पूर्णानंद च्यारी यांनी यावेळी दिली.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम दहा हजार, द्वितीय सहा हजार, तृतीय पाच हजार, चौथे तीन हजार व पाचवे रु. दोन हजार अशी रोख बक्षिसे, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रे दिली जाणार अाहे. तसेच उत्तेजनार्थ व विविध वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार अाहेत.
कोकणी भजनाचा उगम हा साखळीत झाला होता. साखळी गावातच प्रथम कोकणीत भजन सादर होऊन पथके तयार झाली होती. त्यामुळे चार वर्षे मडगाव येथे झालेली ही भजन स्पर्धा यावेळी प्रथमच मडगाव बाहेर थेट साखळीत होत अाहे. या स्पर्धेची तयारी पूर्ण झाल्याचेही यावेळी सांगण्यात अाले.