पहिल्याच दिवशी श्रीलंका ५ बाद २२२ धावा


08th February 2018, 08:14 pm
पहिल्याच दिवशी श्रीलंका ५ बाद २२२ धावा

ढाका :चितगाव येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात धावांचा पाऊस पडला तर मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात यजमान बांगलादेशने श्रीलंकेला पहिल्या दिवशी केवळ २२२ धावांत रोखले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने आपल्या डावात ४ बाद ५६ धावा केल्या होत्या.
चितगाव कसोटीत दोन्ही संघांनी मिळून १५०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या, मात्र दुसरा कसोटी सामना याच्या एकदम उलट झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी एकूण १४ गडी बाद झाले.
पहिल्या कसोटीत बांगलादेशने पहिल्या डावात ५१३ व ३०७ तर श्रीलंकेने ७१३ धावा केल्या होत्या. दुसरीकडे ढाकामध्ये दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशच्या संघाने २२ षटकांत ५६ धावा करत ४ गडी गमावले होते.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व ६५.३ षटकांत २२२ धावांवरच श्रीलंकेचा डाव संपुष्टात आला. पाहुण्या संघाच्या डावात केवळ दोनच फलंदाज कुसल में​डिस (६८) व रोशन सिल्वा (५६) अर्धशतकी खेळी करू शकले. याव्यतिरिक्त एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. बांगलादेशतर्फे अब्दुर रज्जाकने ६३ धावा देत ४ तर तैजूल इस्लामने ८३ धावांत ४ गडी बाद केले. मुस्तफिजुर रहमानने १७ धावांत दोन गडी बाद केले.
श्रीलंकेच्या गोलंदाजांनाही खेळपट्टीकडून खूप मदत मिळाली. लंकेने ४५ धावांतच बांगलादेशचे ४ गडी बाद केले. दिवसाचा खेळ संपला तेव्हा लिटन दास २४ व मेहदी हसन मिराज ५ धावा काढून नाबाद होते.